राज्यातील बंजारा तांड्यांच्या विकासाला स्वतंत्र प्राधिकरणाचे बळ; तीन वर्षांत मूलभूत सुविधांचे उद्दिष्ट

मुंबई,दि. २८ नोव्हेंबर :

 राज्यातील बंजारा समाजाच्या तांडा वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तीन वर्षांत तांड्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह पात्र तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत आणि महसुली गावाचा दर्जा देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात कालबद्ध विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
 बंजारा समाजाच्या तांडा वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, तांड्यांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांत प्रत्येक तांड्यापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविण्यासाठी कालबद्ध विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. या निर्णयाचे धाराशिव बंजारा विरासतचे नेते तथा मंत्री संजय राठोड यांचे समर्थक सचिन राठोड यांनी स्वागत केले आहे.

मंत्रालयात बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर आयोजित बैठकीत बावनकुळे यांनी हे निर्देश दिले. यावेळी कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

तांड्यांमध्ये शाळा, अंगणवाड्या, रस्ते, पाणीपुरवठा, पाण्याच्या टाक्या आणि स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक विकासकामे स्वतंत्र प्राधिकरणामार्फत, तर वैयक्तिक लाभाच्या योजना संबंधित विभागांमार्फत राबविण्यात याव्यात. यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष तयार करण्याचेही निर्देश देण्यात आले.

७०० लोकसंख्येच्या तांड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा
जनगणना पूर्ण झाल्यानंतर ७०० लोकसंख्येचा निकष पूर्ण करणाऱ्या पात्र तांड्यांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करावी. तसेच पात्र तांड्यांना महसुली गावाचा दर्जा देण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे बावनकुळे यांनी सांगितले. प्रत्येक तांड्याचा विकास आराखडा स्थानिक नागरिकांच्या सहभागातून तयार करण्यासाठी तांडास्तरीय समित्याही स्थापन करण्यात येणार आहेत.
पोहरादेवीच्या विकासासाठी स्वतंत्र समिती
पोहरादेवी येथील मंजूर विकासकामांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि भक्तनिवास यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. पोहरादेवी देवस्थानाच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कायद्याचा मसुदा मार्चपर्यंत तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
भाषा, संस्कृती आणि साहित्य संवर्धनावर भर
बंजारा समाजाची बोलीभाषा, लोककला आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्यासाठी पोहरादेवी येथे राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. गोर बंजारा साहित्य अकादमीचे काम गतिमान करून समाजाचा इतिहास व साहित्य मराठी आणि हिंदी भाषेत प्रकाशित करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

दरम्यान, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाला आवश्यक निधी आणि पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर करावा, तसेच परदेशात आणि राज्याबाहेर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती प्रकरणांची तातडीने तपासणी करावी, असेही निर्देश बावनकुळे यांनी दिले.
या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह बंजारा समाजाचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाजाचे प्रमुख 
कालिदास चव्हाण,  विकास जाधव, रवी महाराज राठोड, विष्णू राठोड, चंद्रकांत राठोड, पिंटू राठोड, रवि राठोड, सचिन राठोड, श्रीकांत चव्हाण आदींनी स्वागत करून अभिनंदन केले आहे.