नळदुर्गमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त किल्ले बांधणी स्पर्धा उत्साहात,
राजमुद्रा ग्रुप प्रथम; शंभुराजे ग्रुप द्वितीय, ए.बी. ग्रुपने पटकावला तृतीय क्रमांक

नळदुर्ग, दि. १२ नोव्हेंबर:

दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील आठ विद्यार्थी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेत ज्ञानेश्वरी नितीन सुरवसे, गणेश  विभुते, पद्माक्ष भगवंत सुरवसे, ए.बी. ग्रुप (बसवेश्वर चौक), जय हनुमान ग्रुप (शास्त्री चौक), शंभुराजे ग्रुप (मराठा गल्ली), राजमुद्रा ग्रुप (भुईगल्ली) आणि छत्रपती संभाजी ग्रुप (गवळी गल्ली) यांनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे परीक्षण प्रा. संतोष पवार आणि मुख्याध्यापक श्रीनिवास भोसले यांनी केले. यामध्ये प्रथम क्रमांक राजमुद्रा ग्रुप (भुईगल्ली) यांनी पटकावला. त्यांना दिशा नागरी पतसंस्था, शाखा नळदुर्ग यांच्यातर्फे ३ हजार १ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. द्वितीय क्रमांक शंभुराजे ग्रुप (मराठा गल्ली) यांनी मिळविला. त्यांना प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांच्यातर्फे २ हजार ५०१ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर तृतीय क्रमांक ए.बी. ग्रुप (बसवेश्वर चौक) यांनी मिळविला. त्यांना नगरसेवक आकाश  कुलकर्णी यांच्यातर्फे १ हजार ५०१ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

शास्त्री चौक येथील जय हनुमान बाल ग्रुपने बनवलेल्या जंजिरा या किल्ल्याला आमदार प्रवीण स्वामी  यांनी भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली.  किल्ला बनवणाऱ्या लहान मावळ्यांचे कौतुक केले.


हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे कमलाकर  चव्हाण,  उपप्रमुख संतोष पुदाले, सरदारसिंग ठाकूर, कनकधर सोमनाथ मेहत्रे, दत्तात्रय वाघमारे, नेताजी महाबोले यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

Recent News

 
Top