घोर निष्काळजीपणामुळे आपण सर्वजण अकाली मृत्यूच्या उंबरठ्यावर
(जागतिक पर्यावरण संरक्षण दिन विशेष – २६ नोव्हेंबर २०२६)


पर्यावरण हाच संपूर्ण जीवसृष्टीचा एकमेव आधार आहे. मात्र, आज प्रत्येक भारतीय दूषित हवेत श्वास घेत आहे, तरीही आपण सुधारण्याचे नाव घेत नाही. पर्यावरणाचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सकारात्मक पावले उचलण्याच्या आवश्यकतेविषयी जागतिक स्तरावर जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी ‘जागतिक पर्यावरण संरक्षण दिन’ साजरा केला जातो. वाहनांमधून होणारे उत्सर्जन आणि वाढती गर्दी, औद्योगिक उपक्रम व औष्णिक ऊर्जा प्रकल्प, घरांमध्ये लाकूड, कोळसा यांसारख्या घन इंधनांचे ज्वलन, बांधकामे आणि रस्त्यांवरील धूळ, जैववस्तूंचे तसेच उघड्यावर कचरा जाळणे, शेतांमध्ये पराली (पीक कापणीनंतर उरलेले अवशेष) जाळणे, फटाके फोडणे, हवामानविषयक कारणांमुळे प्रदूषकांचे वातावरणात साचणे, प्रक्रिया न केलेले नगरपालिका सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, रासायनिक वस्त्रोद्योग, अनेकदा कोणतीही प्रक्रिया न करता जड धातू आणि विषारी कचरा जवळच्या जलस्रोतांमध्ये सोडणे, घातक रसायनांचा वापर केलेल्या शेतीतून वाहून येणारे प्रदूषित पाणी, घनकचरा आणि ई-कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन, रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर, खाणकाम आणि औद्योगिक कचरा कुठेही फेकून देणे, तसेच अनियंत्रित बांधकामे आणि व्यावसायिक उपक्रम, अशा अनेक कारणांमुळे प्रदूषणाची पातळी अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचली आहे. 

पर्यावरण कामगिरी निर्देशांक २०२६ नुसार, १७७ देशांच्या यादीत भारताला २२.४६ गुणांसह १७६ वे स्थान मिळाले आहे. या स्थानावरून आपण गंभीर वास्तवाचा अंदाज घेऊ शकतो. भारत देश २०१६ मध्ये १४१ व्या स्थानावर होता. २०२२ मध्ये भारत सर्वांत खराब कामगिरी करणाऱ्या पाच देशांमध्ये समाविष्ट झाला. आपला गुणांक भूतान (८२ वे), श्रीलंका (११८ वे), नेपाळ (१३४ वे), पाकिस्तान (१४८ वे) आणि बांगलादेश (१६१ वे) या शेजारी देशांच्या तुलनेतही मागे आहे. सतत वाढणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यांमुळे हवेची गुणवत्ता, जैवविविधता आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन यांवर सातत्याने दबाव निर्माण होत आहे. तथापि, अक्षय ऊर्जा, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या पायाभूत सुविधांनी सकारात्मक योगदान दिले आहे. जल गुणवत्ता निर्देशांकात भारत १२२ देशांपैकी १२० व्या स्थानावर आहे. २०२६ च्या जागतिक भूक निर्देशांकात १२२ देशांपैकी भारत १०० व्या स्थानावर आहे, भारताचा गुणांक २४.१ असून, त्याचा समावेश ‘गंभीर भूक’ या श्रेणीत होतो. वायुगुणवत्ता जीवन निर्देशांकानुसार, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित देश आहे. भारतातील सुमारे १४० कोटी लोक अशा वातावरणात राहतात, जिथे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या पीएम २.५ च्या पातळीपेक्षाही अधिक आहे. काही भागांमध्ये तर हे प्रमाण भारताच्या स्वतःच्या राष्ट्रीय मानकांपेक्षाही खूप जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सूक्ष्म कणांमुळे एका सामान्य भारतीय व्यक्तीचे आयुर्मान सुमारे ३.५ वर्षांनी कमी होते, तर दिल्ली-एनसीआरसारख्या ठिकाणच्या रहिवाशांच्या आयुर्मानात ८.२ वर्षांपर्यंत घट होऊ शकते.

‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२५’ या अहवालानुसार, २०२३ मध्ये भारतात वायुप्रदूषणामुळे २० लाखांहून अधिक मृत्यू झाले. ही संख्या २००० च्या तुलनेत ४३ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच, ‘द लॅन्सेट काउंटडाउन २०२५’ नुसार, २०२२ मध्ये केवळ मानवनिर्मित सूक्ष्म कणांमुळे १७.२ लाख मृत्यू झाले. या नुकसानीचे आर्थिक मूल्य ३३९.४ अब्ज अमेरिकी डॉलर इतके निश्चित करण्यात आले आहे, जे भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ९.५ टक्के आहे. या आकडेवारीवरूनच देशात निसर्गाप्रती असलेल्या घोर निष्काळजीपणाची आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाची किती मोठी किंमत सामान्य माणसाला मोजावी लागत आहे, याचा अंदाज येऊ शकतो. प्रदूषणामुळे हृदयविकार, पक्षाघात (स्ट्रोक), फुफ्फुसांचे सतत होणारे नुकसान आणि श्वास घेण्यास होणारा गंभीर त्रास, न्यूमोनिया आणि श्वसनसंस्थेचे संसर्गजन्य आजार, कर्करोग निर्माण करणाऱ्या प्रदूषकांचा आणि औद्योगिक उत्सर्जनाचा दीर्घकाळ श्वासावाटे शरीरात प्रवेश झाल्यामुळे होणारा कर्करोग, चयापचयाशी संबंधित आजार, मूत्रपिंडांचे आजार आणि दूषित पाण्यामुळे होणारे आजार, टाइप २ मधुमेह तसेच दीर्घकालीन मूत्रपिंडविकार यांचा धोका सातत्याने वाढत आहे. हे आजार अत्यंत खर्चिक असून, माणसाला मृत्यूच्या दारेत ढकलणारे आहेत.

अलीकडेच ‘इंडिया टुडे’मध्ये प्रकाशित झालेली एक बातमी वाचली. त्यामध्ये प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संजीव बागई यांनी देशात दरवर्षी वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंची तुलना हिरोशिमा, नागासाकी आणि कोविड-१९ मुळे झालेल्या मृत्यूंशी केली आहे. प्रदूषणामुळे मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाचे नुकसान होत आहे. एवढेच नव्हे, तर गर्भवती महिलेच्या उदरात वाढणाऱ्या बाळालाही आजारी पाडत आहे. प्रत्येक गोष्ट ही निसर्गाची देणगी आहे. प्रत्येक व्यवसायासाठी किंवा उद्योगासाठी आवश्यक असणारा कच्चा मालदेखील पर्यावरणातूनच मिळतो. गेल्या काही दशकांमध्ये मानवाने विकासाच्या नावाखाली अनेक यांत्रिक साधनांचा शोध लावला आणि मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचे मोठ्या प्रमाणावर शोषण केले. निसर्गातील अनेक संसाधन तर येणाऱ्या पिढ्यांना पाहायलाही मिळणार नाहीत. म्हणजेच, त्यांच्या वाट्याच्या संसाधनांचाही उपभोग आजच्या मानवाने घेतला आहे.

अनेकदा कोळसा आणि खनिजांच्या उत्खननासाठी किंवा औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी जंगलांची तोड केली जाते. महामार्ग, रेल्वेमार्ग, धरणे बांधण्यासाठी तसेच शहरीकरणासाठी जमिनीवरील नैसर्गिक आच्छादन हटवले जाते. फर्निचर, कागद, बांधकाम आणि इंधनासाठीही सातत्याने झाडांची कत्तल केली जाते. मात्र, जंगलांचा नाश केल्यामुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात. सुपीक मातीचा ऱ्हास होतो आणि मृदेची धूप होते. परिणामी, पूर किंवा दुष्काळासारख्या परिस्थिती निर्माण होतात. कार्बन उत्सर्जन वाढते आणि शुद्ध प्राणवायूचे प्रमाण कमी होते. प्रदूषण वाढते आणि नैसर्गिक आपत्तींच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते. याचा थेट परिणाम जीवसृष्टीतील प्रत्येक सजीवावर, पर्यावरणातील प्रत्येक घटकावर, ऋतुचक्रावर आणि हवामानावर होतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, आजार वाढतात आणि अकाली मृत्यूंमध्ये भयावह वाढ होते.

पर्यावरणातील वाढत्या प्रदूषणाची कारणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय सर्वांनाच माहीत आहेत. म्हणजेच, सरकारपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाला याविषयी माहिती आहे. शुद्ध पाणी, स्वच्छ प्राणवायू आणि पुरेसा पोषक आहार हा प्रत्येक माणसाचा अधिकार आणि गरज आहे. पर्यावरण संरक्षणाप्रती प्रत्येकाची उत्तरदायित्वाची भावना असणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. लोक पर्यावरणाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाहीत आणि सरकारी नियम व कायद्यांची खुलेआम पायमल्ली करतात. ही परिस्थिती आता आपल्या सर्वांच्या जीवावर बेतू लागली आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित, नेते-जनता, अधिकारी आणि उद्योगपती अशा सर्वांनीच सरकारी धोरणे व नियमांचे कठोरपणे पालन केले पाहिजे. तसेच, प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. भ्रष्टाचाराला अजिबात थारा नसावा. मानवापेक्षा अधिक जीवजंतू, पशू-पक्षी आणि इतर प्राणी या पर्यावरणाचे रक्षण करतात. माणूस आपल्या स्वार्थापोटी इतका आंधळा झाला आहे का, की प्राण्यांना पर्यावरणाच्या रक्षणाचे महत्त्व समजते, मात्र माणसाला समजत नाही? माणूस प्राण्यांपेक्षाही खालच्या पातळीवर घसरला आहे का?

लेखक – डॉ. प्रितम भि. गेडाम
(महाराष्ट्र शासनाद्वारे पुरस्कृत लेखक)

ईमेल आयडी – prit00786@gmail.com