उस्मानाबाद :- चैत्र पौर्णिमेनिमित्त कळंब तालुक्यातील येरमाळा येथे दि. 24 ते 30 एप्रिल या कालावधीत श्री येडेश्वरी देवीची यात्रा भरणार असून या निमित्त राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस.टी.बसेसचे नियोजन केले आहे. उस्मानाबाद विभागामार्फत यात्रा कालावधीत 140 बसेसची व्यवस्था करण्यात आली असून त्या नियोजनासाठी 9 अधिकारी, 11 पर्यवेक्षक आणि 35 कर्मचाऱ्यांची नियुक्ति करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक प्रदीप खोबरे यांनी कळविले आहे.
    येरमाळा येथे राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने 26 एप्रिल या यात्रेच्या मुख्य दिवशी 4 यात्रा वाहतूक केंद्रावरुन विविध मार्गावरील वाहतूक करण्यात येणार आहे. उस्मानाबाद,तुळजापूर, लातूर आणि मुरुड या मार्गांकडे जाणाऱ्या बसेससाठी येडशी रोड येथील बीएसएनएल ऑफीस जवळ यात्रा वाहतूक केंद्र असणार आहे. भूम, बीड, वाशी आणि जामखेडकडे जाणाऱ्या बसेससाठी तेरखेडा रोडवर आमराईच्या समोर यात्रा वाहतूक केंद्र असणार आहे. कळंब,केज,धारुर आणि अंबाजोगाई या मार्गावरील वाहतूकीसाठी कळंब रोडवर चौरस्त्याच्या पुढे यात्रा वाहतूक केंद्र असणार आहे तर बार्शी, कुर्डुवाडी, परंडा आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या बसेससाठी बार्शीरोडवर मंदिर प्रवेशव्दाराजवळ यात्रा वाहतूक केंद्र राहणार आहे.
     या यात्रा केंद्रावर प्रवासी निवा-यासाठी मंडपाची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार असून येरमाळा यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांना परतीला पुणे व मुंबई येथे जाण्याकरीता येरमाळा मुख्य बसस्थानकावर 24 तास अगावू आरक्षण तिकीटाची सोय करण्यात आल्याचे  खोबरे यांनी कळविले आहे.          
 
Top