नळदुर्ग -: जन्‍मभूमी सोडून इतरत्र ठिकाणी गेलेल्‍या व्‍यक्‍तींनी सामाजिक बांधिलकी जोपासण्‍यासाठी आपल्‍या मातृभूमीकडे वळून पाहणे गरजेचे आहे. त्‍याचबरोबर त्‍यांनी विधायक कार्यास हातभार लावून मदतीचा हात पुढे करण्‍याचे आवाहन पुणे येथील कमिन्‍स इंडिया संस्‍थेचे के.बी. गहिरवार यांनी केले.  
    नळदुर्ग येथील आपलं घर प्रकल्‍पातील जवळपास दोनशे अनाथ विद्यार्थ्‍यांसाठी पुणे येथील कमिन्‍स इंडिया या संस्‍थेचे किरण गहिरवार, प्रशांत चितळे व त्‍यांच्‍या सहका-यांनी गहू, ज्‍वारी, तांदूळ, दाळ, साखर आदी 50 हजार रुपयेपेक्षा अधिक किंमतीचे  धान्‍य दिले आहे. ऐन दुष्‍काळात अनाथ विद्यार्थ्‍यांना 'धान्‍यरुपी' मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रसंगी बोलताना यावेळी किरण गहेरवार पुढे म्‍हणाले की, कमिन्‍स इंडिया ही संस्था जगभरातील 167 देशांमध्ये कार्यरत असून यापूर्वी संस्‍थेच्‍यावतीने शहरी भागात समाजोपयोगी कार्य करण्‍यात आले आहे. सध्‍या सर्वत्र दुष्काळाचा प्रश्‍न ज्‍वलंत बनला असून या ओढावलेल्‍या आपत्‍तीमुळे जन्‍मभूमीतील माझ्या ग्रामीण भागात आपणास चांगले कार्य करण्याची संधी मिळाल्याचे सांगून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लागणारी सर्व पुस्तके संस्थेच्‍यावतीने पुरविण्‍यात येणार असल्‍याचे शेवटी त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी पूजा कदम या विद्यार्थिनीने 'आपलं घर' चा सविस्‍तर पण संक्षिप्‍त अहवाल मांडला. त्‍याचबरोबर शिवाजी पोतदार, सरदारसिंग ठाकूर आदींनी आपले विचार व्‍यक्‍त केले.
      या कार्यक्रमास आपलं घरचे व्यवस्थापक शिवाजी पोतदार, मुख्याध्यापक सुरेश कांबळे, शिवसेना तुळजापूर उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, पत्रकार सुहास येडगे, विलास येडगे, शिवाजी नाईक, संजय पिसे, सोमनाथ बनसोडे, खंडू मुळे, विजया गिवलकर, वसंत घोडके यासह विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top