भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपल्याला परिचित आहेत. ते विद्वान कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताची राज्यघटना बनविणा-या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते.  आपल्या समाजबांधवांच्या उध्दारासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली. भारतीय समाजव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी मालोजीराव आंबेडकर यांचे शिक्षण फारसे झाले नव्हते. परंतु त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली. त्यामुळेच बाबासाहेब सुशिक्षित, संस्कार-संपन्न व ज्ञानी होऊ शकले.  शुध्द विचार आणि शुध्द आचार यांचे बाळकडू त्यांना त्यांचे वडील आणि आजोबा यांच्याकडून घरातच मिळाले होते.  सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये त्यांच्या शिक्षणाचा आरंभ झाला.  थोड्याच दिवसात तेथून त्यांना मुंबईला यावे लागले.  पुढील शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईत घेतले.  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि सामाजिक व आर्थिक अडचणीवर मात करुन महाविद्यालयीन पदवी मिळविणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीतील ते एक होते.
    त्यानंतर अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी 25 रु. दरमहा याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली.  कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयातील अभ्यास व संशोधन यासाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ  इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या.  बाबासाहेबांना स्वत: शिक्षण घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यामुळे आपल्या पुढील पिढीला या अडचणींना तोंड द्यावे लागू नये, समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना समान शिक्षण मिळाले पाहिजे असे त्यांचे मत होते.  जीवनात शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व आहे हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा मंत्र त्यांनी आपल्या समाज बांधवांना दिला होता.
    मुंबई विधिमंडळाचे सदस्य असताना बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण दुरुस्ती कायद्यावर (1938) कडक टीका केली होती ‘चरखा’हा शिक्षणासाठी माध्यम म्हणून, मुलोद्यागाचे प्रतीक म्हणून स्वीकारल्याने बहुजनसमाज शिक्षणापासून वंचित होईल. त्यांचा शैक्षणिक दर्जा खालावेल, उलटपक्षी शहरातील बुध्दिजीवी वर्गाला शिक्षणापासून फायदा होईल आणि नोकऱ्या मिळण्याच्या दृष्टीने त्यांना त्याचा फायदा होईल असे बाबासाहेबांचे मत होते.
    20 जून 1946 रोजी बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे मुंबईत सिध्दार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.  एखाद्या धनिकाकडून मोठी देणगी घेऊन महाविद्यालयाला त्याचे नाव त्यांना देता आले असते. परंतु त्यांनी तसे केले नाही, तर महाविद्यालयाला भगवान बुध्दांचे नाव दिले.  सिध्दार्थ महाविद्यालय सुरु करताना बुध्दांच्या शिष्यांची ध्येये त्यांनी डोळ्यापुढे ठेवली होती. ही ध्येये म्हणजे सत्याचा शोध घेणे आणि मानवता शिकवील अशा धर्माची शिकवण आचरणात आणणे.  जरी त्यांनी पीपल्स एज्युकेशन्स सोसायटी स्थापन केली तरी शैक्षणिक सवलती देणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे त्यांचे मत होते.
    विद्यमान शिक्षण प्रणालीमुळे चांगले प्राध्यापक तयार होऊ शकत नसल्याचे बाबासाहेबांचे मत होते.  निरनिराळ्या विषयांच्या गट पध्दतीचा त्यांनी पुरस्कार केला होता. प्राध्यापकांची अध्यापन आणि संशोधन ही दोनच कार्य असल्याचे त्यांनी सांगितले होते. विद्यापीठ व महाविद्यालये यांच्या प्रतिनिधींनी समान दर्जाने एकत्र येऊन पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आखून अंमलात आणावेत अशी योजना त्यांनी मांडली होती.
    स्वतंत्र मजूर पक्षाच्या 1937 च्या निवडणूक जाहीरनाम्यात शैक्षणिक प्रस्तावाबाबतचे धोरण मांडण्यात आले होते.  पूर्ण आणि सक्तीचे शिक्षण व तांत्रिक शिक्षण यावर त्यांचा विशेष भर होता.  यावरुन बाबासाहेबांची दूरदृष्टी  दिसून  येते.  शैक्षणिकदृष्ट्या  मागास  समाजात  सरकारी  मदतीने  शिष्यवृत्त्या  देण्याचे  महत्त्व  त्यांनी सांगितले होते.  विद्यापीठाच्या शिक्षणाची पुनर्घटना करुन शिक्षण देणाऱ्या विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी विद्यापीठ कायद्यात दुरुस्ती करण्याचा त्यांचा विचार होता.  मुला-मुलींना मॅट्रिक परीक्षेपर्यंत समान शिक्षण द्यावे असे बाबासाहेबांचे मत होते. मुली गृहशिक्षणात तरबेज असाव्यात यावर त्यांचा कटाक्ष होता. 
    मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात बाबासाहेब आधी प्राध्यापक आणि नतर 1 जून 1935 पासून पुढील तीन वर्षे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. महाविद्यालयाच्या सर्व कार्यक्रमात तसेच त्यांचा विस्तार करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांचे अध्यापन अत्यंत तयारीने होत असे.  याबाबत त्यांच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या आठवणी लिहिल्या आहेत.  कायदा या विषयाची गोडी आणि व्यासंग मोठा म्हणून त्यांनी महाविद्यालयाचे ग्रंथालय अत्यंत समृध्द केले.
    प्राध्यापकाबाबत बाबासाहेबांच्या कांही स्पष्ट कल्पना होत्या.  प्राध्यापक हा नुसता पढीक विद्वान असू नये. त्याने स्पष्ट आवाजात बोलले पाहिजे. सर्व दृष्टींनी तो अभ्यासू असला पाहिजे. त्याने विद्यार्थ्यांमधील स्तुप्त गुण वाढीस लावले पाहिजेत. प्रा.सेलिग्मन आणि इतरांनी आपल्या बाबतीत असेच केल्याचे ते सांगत.  प्रा.सेलिग्मन यांनी बाबासाहेबांना सांगितले की, तुम्ही तुमचे काम चालू ठेवा म्हणजे तुमचे तुम्हालाच संशोधन कसे करावे हे कळेल.
    विद्यार्थ्यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात राजकारणात प्रत्यक्ष भाग घेऊ नये, त्यांनी कांही जीवनमूल्ये आत्मासात करावीत आणि ती आयुष्यात प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे त्यांना वाटत होते. स्वावलंबनाचे व संस्कृती संवर्धनाचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यावर बिंबविण्याचा प्रयत्न केला.  काही ध्येय निश्चित करावे व त्यासाठी सतत परिश्रम करुन चिकाटीने ते प्राप्त करावे असे ते विद्यार्थ्यांना सतत सांगत असत. 
    डिसेंबर 1952 मध्ये बाबासाहेबांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या संमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या भाषणात बदलत्या काळाच्या गरजेप्रमाणे विद्यापीठीय शिक्षणाची पुनर्रचना करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.  विद्यापीठ म्हणजे “ज्ञानगृह”असावे, कारकून तयार करण्याचे केंद्र नसावे असे त्यांनी सांगितले. ज्ञानाशिवाय त्यांना दुसरे काही पवित्र वाटत नव्हते. रानडे, गोखले व टिळक यांची उज्ज्वल परंपरा,अखंड परिश्रम, उच्च ध्येय आणि सार्वजनिक जीवनाविषयीची उच्च जाणीव यांची त्यांनी विद्यार्थ्यांना आठवण करुन दिली.
    शैक्षणिक क्षेत्रात बाबासाहेबांनी दिलेले योगदान महत्वाचे आहे. त्यांनी स्थापन केलेले सिध्दार्थ महाविद्यालय आणि त्यांनी प्राचार्य पद भूषविलेले विधी महाविद्यालय ही मुंबईतील दोन्ही महाविद्यालये सामाजिक परिवर्तनाला गती देणारी केंद्रे ठरली आहेत. भारतीय समाज व्यवस्थेच्या सुधारणेसाठी आणि सामाजिक क्रांतीसाठी वाहून घेतलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही समयोचित आहेत.
 
- डॉ. दिलीप साधले
 
Top