उस्‍मानाबाद : शहराच्या विकासासाठी उजनीचे पाणी नवे पर्व ठरणार आहे. शहरवासीयांना दर तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणी वितरण व्यवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मदतीने आगामी सहा
महिन्यात शहरातील पाण्याची संपूर्ण वितरणव्यवस्था संगणकीकृत करणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
    उजनी पाणीपुरवठा योजनेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष अमित शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. बहुप्रतिक्षेत उजनी पाणीपुरवठा योजनेचे पाणी शुक्रवारी रात्री शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात दाखल झाले. शनिवारी दुपारपर्यंत ५५ लाख लिटर पाणी शहरात आले होते. दररोज उजनी जलाशयातून उस्मानाबादकरांना ८० लाख लिटर पाणी मिळणे अपेक्षित होते. मात्र २५ टक्के पाणी आपणांस आगावू मिळत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. दिवसभरात आलेल्या पाण्याचा वेग पाहता, दररोज एक कोटी लिटर पाणी शहरात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरवासीयांची गरज भागवून उर्वरित पाणी मागणीनुसार ग्रामीण भागात वितरित केले जाणार आहे. कौडगाव औद्योगिक वसाहतीत पाण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध झाल्यामुळे आता वेगात उद्योग येतील. रेल्वे, जमीन आणि पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे अनेक मोठमोठे उद्योग या भागात येण्यास उत्सूक आहेत. त्यामुळे उजनीचे पाणी उस्मानाबादच्या विकासाचे नविन पर्व ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उजनी धरणातील उस्मानाबाद शहर पाणीपुरवठ्याची विहिर ज्याठिकाणी आहे, तेथील पाणीपातळी सध्या ४८८ मिटर एवढी आहे. धरणातील पाणी कितीही वेगाने कमी झाले, तरीदेखील उस्मानाबादकरांना पाणीटंचाई जाणवणार नाही.
    उजनी जलाशयातून आलेले पाणी तेरणा आणि रुईभर या जलशुद्धीकरण केंद्रातून शहरवासीयांना दिले जाणार आहे. तेरणा जलशुद्धीकरण केंद्रातील जुन्या युनिटमध्ये ४८ लाख लिटर तर नविन जलशुद्घीकरण केंद्रात ५७ लाख लिटर पाणी प्रतिदिन शुद्घ करण्याची क्षमता आहे. तर रुईभर येथील जलशुद्धीकरण केंद्रात ५४ लाख लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. शहरात विविध भागात असलेल्या जलकुंभामधून ४८ लाख ५० हजार लिटर पाणी साठवण करण्याची क्षमता आहे. दिवसातून तीनवेळा ही साठवणुक करून शहरवासीयांना पाणी वितरित केले जावू शकते. त्यामुळे दररोज किमान एक कोटी ५० लाख लिटर पाणी शहरवासीयांना सहज उपलब्ध करून देता येईल अशी जलसाठवणुक क्षमता पालिका प्रशासनाकडे उपलब्ध आहे. तेरणा जलशुद्धीकरण केंद्रात साडेदहा लाख लिटर आणि तीन लाख लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ आहेत. तांबरी विभागात नऊ लाख लिटर, समर्थनगर येथे साडेसात लाख लिटर, शहर पोलिस ठाण्यासमोरील जलकुंभात अडीच लाख लिटर, उंबरेकोठा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जलकुंभात अडीच लाख लिटर तर रुईभर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील जलकुंभात १३ लाख लिटर पाणी साठवून ठेवता येईल, एवढी क्षमता असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुजित जाधव यांनी सांगितले.
    पाणी पुरवठा व्यवस्थीत झाल्यानंतर हे पाणी गरजेनुसार उस्मानाबाद, तुळजापुर, कळंब तालुक्यातील ग्रामिण भागात हे पाणी गरजेनुसार देण्यात येणार आहे. तसेच शहरातील ज्या भागात पाणी वितरीत करण्याची व्यवस्था नाही. त्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असुन त्या भागातील नागरकांनी टँकरची मागणी केल्यानंतर लगेचच पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या चोराखळी येथुन करण्यात येणारा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असुन बाहेरुन पाणी पुरवठा करणारे सर्व टँकर बंद करण्यात आले असुन पाणी पुरवठा करण्यासाठी सात टँकर सुरु आहेत.
    यावेळी नगरपालीकेच्या वतीने उजनी पाणीपुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी मदत केल्याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे, पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, आ. बसवराज पाटील तसेच प्रशासकीय अधिका-यांचेही व अनेक दिवस संयम बाळगल्याबद्दल नागरीकांचे आभार मानण्यात आले.
 
Top