तुळजापूर - मौजे जळकोट (ता. तुळजापूर) येथील एका महाविद्यालयात परप्रांतीय विद्यार्थ्‍यास इयत्‍ता दहावीमध्‍ये विज्ञान विषयात 40 गुण नसताना इयत्‍ता बारावी विज्ञान वर्गात नियमबाह्य व गैरमार्गाने प्रवेश दिल्‍याचे उघडकीस आले आहे. तसेच दहावीच्‍या टि.सी. वरून चक्‍क बारावीच्‍या वर्गात प्रवेश दिला आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत महाविद्यालयाचा गैरप्रकाराबद्दल विद्यार्थी व पालकात चर्चेला उधाण आले आहे.
महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळ लातूर विभागीय सचिव याना कदम जगन्‍नाथ नागनाथ यानी लेखी तक्रार देऊन त्‍यात म्‍हटले आहे की, मौजे जळकोट ता. तुळजापूर येथील इंदिरा काळे कला व विज्ञान महाविद्यालयाने सन 2011-12 या शैक्षणिक वर्षात इयत्‍ता बारावी विज्ञान वर्गात शोएब इब्राहिम साब या परप्रांतीय विद्यार्थ्‍याला इयत्‍ता दहावीमध्‍ये विज्ञान विषयात 40 गुण नसताना प्रवेश दिला आहे. तसेच दहावीच्‍या टि.सी. वरून चक्‍क बारावीच्‍या वर्गात प्रवेश दिल्‍याचे नमूद केले आहे. सदरील विद्यार्थी हा राज्‍याबाहेरील असून त्‍याचा योग्‍यता फॉर्मही भरलेला नाही, असे सांगून सन 2012-13 याही शैक्षणिक वर्षात इयत्‍ता दहावीमध्‍ये विज्ञान विषयात 40 गुण नसताना अनेक विद्यार्थ्‍यांना संस्‍थाचालकांनी पुढच्‍या वर्गात प्रवेश दिल्‍याचे म्‍हटले आहे. याप्रकरणाची चौकशी करून संस्‍थेची मान्‍यता काढून घ्‍यावी व प्राचार्यास निलंबित करण्‍याची मागणी कदम जगन्‍नाथ यानी केली आहे. याची एक प्रत माहितीस्‍तव उस्‍मानाबाद जिल्‍हाधिकारी, पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आदीना देण्‍यात आले आहे.
 
Top