चिकुंद्रा - बेरोजगारी ही भारतातील विशेषतः ग्रामीण भागातील एक जुनी समस्‍या असून ती सोडविण्‍याच्‍या दृष्‍टीने एक रोजगार विनिमय केंद्र म्‍हणून उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात राज्‍यातील अद्ययावत गोडया पाण्‍यातील मत्‍स्‍य संशोधन केंद्र उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात सुरू करण्‍याची मागणी जोर धरत असून याप्रकरणी मत्‍स्‍यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी लक्ष घालण्‍याची मागणी होत आहे.
वास्‍तवात आज देशातील बेरोजगारी घटल्‍याचा दावा केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने केला असला तरी ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण आजही अधिकतम आहे. यासाठी रोजगाराच्‍या क्षेत्रात मत्‍स्‍य व्‍यवसायाला चालना मिळावी म्‍हणून तसेच रोजगाराच्‍या उपलब्‍धतेसाठी मत्‍स्‍य संशोधन केंद्र निर्मितीची गरज आहे. महाराष्‍ट्रात सद्य स्थितीत अद्ययावत असे गोडया पाण्‍यातील मत्‍स्‍य संशोधन केंद्र नाही. त्‍याकरीता उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात गोडया पाण्‍यातील मत्‍स्‍य संशोधन केंद्र निर्मितीची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. जिल्‍ह्यात सध्‍या तेरणा, रूई, वाघोली, कुरनूर, हरणी, खंडाळा, जकेकूर, तुरोरी, बेनीतुरा, रायगव्‍हाण, बाणगंगा, रामगंगा, संगमेश्‍वर, खासापूर, चांदणी, खंडेश्‍वर, साकत असे मिळून 17 मध्‍यम प्रकल्‍प व 161 लघु प्रकल्‍प आहेत. पैकी तेरणा मध्‍यम प्रकल्‍प किंवा तुळजापूर तालुक्‍यातील बोरी धरणालगत (कुरनूर मध्‍यम प्रकल्‍प) येथे शास्‍त्रशुद पद्धतीने मत्‍स्‍यव्‍यवसाय करण्‍यासाठी नागपूर येथील महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठांतर्गत मत्‍स्‍य संशोधन केंद्र निर्माण करण्‍याची अनेक दिवसाची मागणी आहे. सध्‍या ना. मधुकरराव चव्‍हाण हे राज्‍याचे पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व जिल्‍ह्याचे पालकमंत्री म्‍हणून काम पाहत आहेत. त्‍यांच्‍या कारकिर्दीत जिल्‍ह्यात अनेक लहान-मोठी प्रकल्‍प झाल्‍यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या सध्‍याच्‍या कारकिर्दीत जिल्‍ह्यात अपेक्षित ठिकाणी मत्‍स्‍य संशोधन केंद्र उभारण्‍यासाठी मत्‍स्‍य सहकारी संस्‍था, बेरोजगार, मत्‍स्‍य व्‍यावसायिक यांच्‍या आशा उंचावल्‍या आहेत. अपेक्षित मत्‍स्‍य संशोधन केंद्र उभारल्‍यास या केंद्रातून शास्‍त्रशुध्‍द व तांत्रिक व्‍यवसाय प्रशिक्षण दिले जाईल. शिवाय व्‍यावसायिकांनी सल्‍ला व सहाय्य मिळण्‍यास मदत होईल, मत्‍स्‍य बीज उत्‍पादन मोठयाप्रमाणात होर्इल, त्‍याचबरोबर मत्‍स्‍य व्‍यावसायिकांचे आर्थिक जीवनमान उंचावून बेरोजगार युवकाना रोजगाराची नवी संधी उपलब्‍ध होईल. एकंदर मत्‍स्‍यव्‍यवसायाला अधिक चालना मिळण्‍यासाठी मत्‍स्‍यसंशोधन केंद्राची मागणी मत्‍स्‍य सहकारी संस्‍था, मत्‍स्‍य व्‍यावसायिक व संबंधितातून होत आहे. * भैरवनाथ कानडे पत्रकार
 
Top