तुळजापूर :-  तीन दिवसांपूर्वी ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा पिंपळा (बु) शिवारात मातीनाल्याच्या बांधाखाली असलेल्या झुडप्यामध्ये मृतदेह आढळून आले होते. याप्रकरणी वैद्यकीय अधिका-याच्या शवविच्छेदन अहवालावरून सदरील महिलेच्या तोंडावर व हातावर मोठयाप्रमाणावर जखमा आढळून आल्या व घटनास्थळी रक्तस्त्राव मोठयाप्रमाणावर झाले असून या बाबीवरून त्या महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक भरत राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेक-याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    तुळजापूर तालुक्यातील धोत्री, पिंपळा, देवकुरुळी या गावच्या शिवारात वनविभाग व गायरानाचे क्षेत्र आहे. पिंपळा (बु) हद्दीतील गायरान जमिनीमध्ये ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती गुराख्यांनी पोलिस पाटील धैयश्रील राजेपांढरे  यांना दिली. त्यावरून बुधवारी पोलिस पाटील यांनी घटनास्थळी जावून खात्री करून पोलिसांना माहिती कळविली. या घटनेची पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.  तुळजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मिष्ठा घाडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय कुलकर्णी यांनी पंचासह घटनास्थळी भेट दिली. यावेळी सदरील महिलेच्या प्रेताचा बीट अंमलदार प्रभाकर कुलकर्णी, सुनिल यादव यांनी पंचनामा करुन काटगाव प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी घटनास्थळीच प्रेताचे शवविच्छेदन केले.
मयत महिलेच्या अंगावर काळपट गुलाबी रंगाचे ठिपके असलेला ब्लाऊज, हातात काचेच्या बांगड्या, पायामध्ये पैंजण आहे. सदरील महिलेचे प्रेत पूर्णत: कुजलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले. पाच दिवसापूर्वी तिचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेच्या तोंडावर व हातावर मोठय़ा जखमा होत्या तर प्रेताशेजारी मोठय़ा प्रमाणावर रक्तस्त्राव झालेला दिसत होता. शवविच्छेदनाच्या वैद्यकीय अहवालावरून सदर महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव व प्रदिप साळूंके हे करीत आहेत.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पिंपळा बु शिवारातील घटनास्थळी भेट दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मीष्ठा घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव,  पोलीस उपनिरीक्षक भरत राठोड यांच्यासह पोलिस कर्मचारी व सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ हजर होते.
 
Top