नळदुर्ग :-  अपघातग्रस्त कारमध्‍ये नळदुर्ग येथे आढळलेल्या गांजाप्रकरणी एका आरोपीस पोलिसानी अटक करुन शुक्रवार रोजी उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता त्यास सात दिवसाची म्हणजे दि. ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश महाजन कोर्टाने दिल्याचे पोलिसानी सांगितले.
      एम. मल्लेश गंगाराम रेड्डी (वय ३३ वर्ष, रा. निजामाबाद, हल्ली मुक्काम हैद्राबाद) असे पोलिस कोठडी मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. दि. १८ सप्‍टेंबर रोजी नळदुर्गहून तुळजापूरकडे भरधाव वेगाने फियाट कार क्रमांक एपी १६ पी ३४९९ ही जात असताना सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्यासमोर झुंबर नागनाथ गायकवाड यास जोरदार धडक देवून कार रस्त्याच्या कडेला जावून अपघात झाला होता. त्यात गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर चालकासह अन्य एकजण कार जागीच सोडून पळून गेले होते. या कारमध्ये १५० किलो गांजा आढळून आला होता. पोलीसानी पंचनामा करुन  कारसह सुमारे ३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल पोलिसानी जप्त केला होता. याप्रकरणी पोलिसानी तपास करुन अवघ्या दहा दिवसात आरोपी मल्लेश रेड्डी यास गुरुवार रोजी रात्री पाऊणे नऊ वाजता हैदराबाद येथे अटक करुन आज शुक्रवार रोजी उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता दि. ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे-वालवलकर हे अधिक तपास करीत आहेत.
 
Top