नळदुर्ग  :-    गुलालाची मुक्त उधळण, ढोल ताशाच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽ च्या जयघोषात नळदुर्ग येथे तब्बल अकरा तास ‘श्री’ च्या मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले.
                  शहरातील विविध गणेश मंडळानी शनिवार रोजी सकाळपासूनच लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी टॅक्टर सजविण्यास सुरुवात केली होती. दुपारी तीन वाजता शहराच्या विविध भागातून मिरवणुकीस प्रारंभ झाले. ही मिरवणूक ऐतिहासिक किल्ला गेट येथे सायंकाळी पाच वाजता आली. त्यानंतर क्रांती चौक, चावडी चौक मार्गे धर्मवीर चौकातून बोरी घाटावर गणरायाचे विसर्जन उत्साहाने करण्यात आले. मिरवणुकीमध्ये शिवशाही तरुण गणेश मंडळ, जय हनुमान तरुण गणेश मंडळ, जय भवानी गणेश मंडळ, न्यू चैतन्य गणेश मंडळ, नवचैतन्य गणेश मंडळ, धर्मवीर गणेश मंडळ, भोईराज गणेश मंडळ, जवाहर गणेश मंडळ, इंदिरानगर गणेश मंडळ, भवानी नगर गणेश मंडळ, जयहिंद गणेश मंडळ या मुख्य गणेश मंडळासह इतर गणेशमंडळानी गणपतीची आकर्षक सजावट करुन टॅक्टरवर विद्युत रोषणाई केली होती. अनेक मंडळाने लेझीम संघ, भजनी मंडळ, नृत्य भारदारपणे सादर केले. तर काही मंडळाच्या पुढे पथनाट्य सादर करण्यात आले. तर काही मंडळाने देखावा सादर केला होता. चावडी चौकात शहर युवक कॉंग्रेसच्यावतीने श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील चव्हाण यांच्या हस्ते तर दृष्टी उद्योग समूहाचे मुख्य प्रवर्तक अशोक जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व गणेश मंडळास सन्मानपत्र वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष नितीन कासार, उपनगराध्यक्ष शहबाज काझी, नायब तहसिलदार तथा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी राजेश जाधव, नगरसेवक कमलाकर चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे वालवलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गायकवाड, मुबारक शेख यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरीक, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
                 मिरवणुकीमध्ये नगरपालिकेच्यावतीने पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात आले. त्याचबरोबर ‘श्री’ च्याविसर्जन बोरी घाटाचे नगरपालिकेच्यावतीने स्वच्छता करण्यात आली होती. दुपारी तीन वाजता सुरु झालेली मिरवणुक रात्री दीड वाजेपर्यंत सुरु होती. पहिल्यांदा माऊलीनगर गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर शिवशाही गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. सातव्या दिवशी व्यापारी गणेश मंडळ, पोलीस ठाणे गणेश मंडळाचे तर नवव्या दिवशी महाराणा गणेश मंडळाचे त्याचबरोबर दहाव्या दिवशी अंजनी प्रशालेच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आलेे. मिरवणुक शांततेत पार पडली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


 
Top