मुंबई -: भारत सरकारच्या जल संसाधन मंत्रालयातर्फे देण्यात येणा-या राष्ट्रीय जल पुरस्कार आणि भूजल पुरस्कारांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्या संदर्भातील उचित कार्यवाही करण्यासाठी जलसंपदा विभागाची नोडल विभाग म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 
या पुरस्कारांसाठी प्राप्त होणारे प्रस्ताव किंवा अर्ज तपासून त्यांची छाननी करण्यासाठी अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (कृषी), अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (पाणी पुरवठा व स्वच्छता), अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव (नगर विकास-2), अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव (उद्योग), प्रधान सचिव / सचिव (जलसंपदा प्रकल्प व विकास), सं. व्य. दहासहस्त्र (सेवा निवृत्त सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण),          एस.एन.सहस्त्रबुध्दे (सेवानिवृत्त कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग), प्रादेशिक संचालक (केंद्रीय भूमीजल मंडळ, नागपूर) हे या समितीचे सदस्य असून मुख्य अभियंता (द.व. प्र.) व सहसचिव, जलसंपदा विभाग हे सदस्य सचिव आहेत. 
प्राप्त प्रस्तावांमधून सुयोग्य अशा 3 प्रस्तावांची निवड करण्यासाठी जलसंपदा विभाग राज्यस्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन करणार असून त्यानंतर समितीने शिफारस केलेले प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. या बैठकीसाठी ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिव / सचिव यांना निमंत्रित सदस्य म्हणून निमंत्रित करण्यात येईल.
हा शासन निर्णय दिनांक 16 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिध्द करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाच्या www.mah.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याचा संगणक सांकेतांक 201210121140470427 असा आहे.


* राष्ट्रीय जल पुरस्कार आणि भूजल संवर्धन पुरस्कारासाठी 15 नोव्हेंबर पूर्वी अर्ज पाठवावेत

मुंबई -: भारत सरकारच्या जल संसाधन मंत्रालयातर्फे भूजल पातळी वाढविण्यासाठी आणि पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडविण्यासाठी वेगवेगळी तंत्रे व कार्यपध्दतीचा अवलंब करणाऱ्या तसेच पाण्याचा सुयोग वापर, पुनर्भरण व पुनर्वापर पध्दतीचा वापर करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणा-या संस्थां, व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांना राष्ट्रीय जल पुरस्कार आणि भूजल संवर्धन पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी केंद्र सरकारने ठरविलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे नामनिर्देशन अर्ज प्रधान सचिव (ज.सं. प्र. व विकास), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे दिनांक 15 नोव्हेंबर 2012 पूर्वी पाठवावेत, असे आवाहन अवर सचिव, जलसंपदा विभागाने केले आहे.
या पुरस्कारांसाठी प्राप्त होणारे अर्ज 30 नोव्हेंबर 2012 पूर्वी जलसंसाधन मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली येथे पाठवावयाचे आहेत. पुरस्कारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाची नोडल विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशन अर्जांची छाननी करुन सुयोग प्रस्तावांची निवड करण्यासाठी अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. 
सन 2007 ते 2010 पर्यंत 20 भूजल संवर्धन पुरस्कार व एक राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात येत होता. 2011 मध्ये या पुरस्कारांचे खालीलप्रमाणे सात विभागात वर्गीकरण करण्यात आले आहे.
  भूजल क्षेत्रामध्ये अत्युत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीस/संस्थेस राष्ट्रीय पुरस्कार ; भूपृष्ठीय जलक्षेत्रामध्ये अत्युत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीस/संस्थेस राष्ट्रीय पुरस्कार ; जलक्षेत्रामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापराबाबत राष्ट्रीय पुरस्कार; उद्योग संस्थांना जलक्षेत्रामधील राष्ट्रीय पुरस्कार; पंचायत राज संस्थांना जलक्षेत्रामधील राष्ट्रीय पुरस्कार; अशासकीय संस्था, पाणी वापर संस्था, पाणी पंचायत व समाजाचा सहभाग या करिता जलक्षेत्रामध्ये राष्ट्रीय पुरस्कार; नागरी स्थानिक संस्थांना जलक्षेत्रामध्ये राष्ट्रीय पुरस्कार. 
या पुरस्कारासंबंधी माहिती www. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे.

* राष्ट्रीय हरित सेना योजना अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावर समन्वय अधिकारी नियुक्त

मुंबई -: सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे येथील अपर महासंचालक (संनियंत्रण व मुल्यांकन) यांची राष्ट्रीय हरित सेना योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावर समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण विभागाने 6 सप्टेंबर 2012 रोजी हा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संगणक सांकेतांक 201209061103052200 असा आहे.
 
Top