लंडन -: सध्‍याच्‍या सोशल नेटवर्किंगच्‍या हायटेक जमान्‍यात फेसबुकला अनन्‍यसाधारण महत्‍त्‍वाचे स्‍थान प्राप्‍त झाले आहे. भारतामध्‍ये जरी हे संकेतस्‍थळ केवळ चॅटिंगपुरते मर्यादित असले तरीसुध्‍दा ब्रिटन आणि अमेरिकेमध्‍ये मात्र ते प्रचाराचे प्रभावी साधन बनले आहे. या देशांतील मातानी विचित्रच मोहीम राबवली असून त्‍या चक्‍क फेसबुकच्‍या माध्‍यमातून स्‍वतःचे दूध विकत आहेत. लोकांनी जरी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला असला तरी डॉक्‍टरांनी मात्र या दुधाच्‍या विक्रीचे गंभीर परिणाम होण्‍याची शक्‍यता वर्तविली आहे. ऑनलाईन मातेचे दूध विकत घेणा-या मंडळीनी मात्र हेच दूध मुलांसाठी पोषक असल्‍याचे म्‍हटले आहे. आईच्‍या दुधाच्‍या विक्रीसाठी अमेरिका आणि ब्रिटनमध्‍ये स्‍वतंत्र संकेतस्‍थळेदेखील अस्तित्‍वात आली आहेत. ब्रिटनमध्‍ये मातृदुग्‍धदानासंबंधी असंख्‍य कायदे प्रचलित आहेत. ज्‍या मातांना आपल्‍या मुलास दूध पाजणे शक्‍य होत नाहीत, त्‍या माता याच ऑनलाईन मार्गाचा स्‍वीकार करतात. यासाठी ब्रिटनमध्‍ये ठिकठिकाणी मातृदूध संकलन केंद्र सुरू करण्‍यात आली आहेत. आता जर्मनीमध्‍येही काही महिला केवळ पैशासाठी स्‍वतःचे दूध विकत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. यासाठी त्‍यांनी चक्‍क फेसबुकचा आधार घेतला आहे; पण अशा दुधाच्‍या माध्‍यमातून बालकास एचआयव्‍ही अथवा अन्‍य संक्रामक आजार होण्‍याची शक्‍यता अधिक असते, असे डॉक्‍टरांनी म्‍हटले आहे.
* सौजन्‍य पुढारी 
 
Top