मुंबई -: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दुस-या अखिल भारतीय महिला लोककला संमेलन-2012 चे उद्घाटन सोमवार दि.22 ऑक्टोबर सकाळी 9.30 वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे.
दि.22 व 23 ऑक्टोबर असे दोन दिवस चालणारे हे संमेलन महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग, भारत सरकार संगीत नाटक अकादमी आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व लोकरंग सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
या महिला लोककला संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती माया जाधव असून स्वागताध्यक्षा महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री प्रा.वर्षा गायकवाड आहेत. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी, पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर व खासदार एकनाथ गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
तसेच विशेष अतिथी म्हणून पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक शैलेंद्र दशोरा, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक श्रीमती सुप्रभात अगरवाल, सांस्कृतिक कार्य संचालक आशुतोष घोरपडे, चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सुमंगल पब्लिकेशनचे संचालक जयराज साळगावकर उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार दि.23 ऑक्टोबरला सायंकाळी 6 ते 7 वाजता संमेलनाचा समारोप होईल. समारोपास विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
