नळदुर्ग -: अणदूर (ता. तुळजापूर) या गावात मुलभूत सुविधांसाठी पंचायत समिती सदस्‍याला महिलांनी घेरावा घालून आपल्‍या व्‍यथा मांडल्‍याने सर्वत्र जोरदार चर्चा रंगत आहे.
          तुळजापूर तालुक्‍यातील अणदूर येथे वत्‍सलानगर मध्‍ये मुलभूत सुविधांचा अभाव असल्‍याने महिलांनी पंचायत समिती सदस्‍य साहेबराव घुगे यांना घेरावा घातला. यावेळी महिलांनी आपल्‍या समस्‍या मांडल्‍या. अणदूर येथील राष्‍ट्रीय महामार्गालगत चिवरी पाटीवर वसलेल्‍या वत्‍सलानगरात मुलभूत सुविधा उपलब्‍ध नाहीत. महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. आडोसा म्हणून ग्रामपंचायतीने तटभिंती बांधल्या असल्या तरी या ठिकाणी काही अतिक्रमणधारकांनी कब्जा केला आहे. त्यामुळे महिलांची मोठी अडचण झाली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पक्के रस्ते, नाल्या, पुरेशे पथदिवे व सार्वजनिक शौचालय नाही. या सर्वच समस्यांच्या अनुषंगाने आज महिलांनी घेराव घालून जाब विचारला. ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासन व स्थानिक राजकीय लोकांच्या दुर्लक्षामुळे हागणदारीमुक्त अभियानाचा बोजवारा उडाला असल्याने महिलांना उघड्यावर शौचास बसावे लागत असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला. याप्रकरणी ग्रामसेवक शावरू माशाळकर यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकले नाही. या घेरावो वेळी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या आशाबाई कांबळे, सुंदरबाई शिरगिरे, सुजाता कसबे, रूक्मीणीबाई गायकवाड, जमिला नदाफ, सिंधुबाई मोटे, रेखा कांबळे आदींसह सुमारे शंभर महिला सहभागी झाल्या होत्या.  

 
Top