उस्मानाबाद :- जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी आज तामलवाडी, पिंपळा (बु.), देवकुरळी, पिंपळा खुर्द येथे पाणी,चारा टंचाईबाबत, तसेच रोजगार हमीच्या कामासंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा केली. 
               सोलापूरहून येताना श्री चव्हाण यांनी तामलवाडी  ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी जि.प.चे कृषि सभापती पंडीत जोकार, तुळजापूरचे तहसिलदार व्ही.एल.कोळी, तसेच गावाचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.त्यानंतर त्यांनी पिंपळा (बु.), पिंपळा खुर्द, देवकुरळी, येथेही त्यांनी चर्चा केली.
                     ना. चव्हाण यांनी यावेळी  गावातील लोकांच्या समस्या ऐकुन घेतल्या. यावर्षी पाऊस अत्यल्प असल्याने सर्व ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न महत्वाचा असल्याने गावात पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामसभेत ठराव घ्यावा. त्याचे प्रस्ताव ताबडतोब सादर करण्यास त्यांनी सांगीतले. प्रस्ताव सादर केल्यावर त्यावर तात्काळ सर्व्हे करुन मंजूरी देण्यात येईल असेही त्यांनी सोगीतले. यासोबतच पाणी पुर्नभरण करावे. त्याने पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल व गावास पाणी मिळेल असेही ते म्हणाले. यासाठी तुळजापूर येथे लवकरच पाणी पुनर्भरण करण्यासंदर्भात एक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. भुगर्भातील पाण्याची पातळी तीसऱ्या स्तरावर गेली असल्याचे पाणी जपून वापरा असा संदेशही त्यांनी दिला.
                 रोजगार हमी योजनेंतर्गत गावातील कामांना मंजूरीचे प्रस्ताव तयार करा, त्यांना मंजूरी  मिळेल,त्यामुळे मजुरांना काम मिळेल असेही त्यांनी सांगीतले.आणेवारी प्रमाणे यंदा खरीप पिके चांगली आली आहेत.  शेतीला दुग्धव्यवसाय हा पुरक व्यवसाय आहे. दुधाचे उत्पादनही वाढले आहे. या वर्षी पावसाअभावी चारा टंचाई होत आहे. परंतू त्यावरही मात करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
                   देवकुरळी येथे सभागृहात बोलताना ना.चव्हाण यांनी सांगीतले की, समाजकल्याण खात्याकडे अनेक योजना असतात. पुढील पिढीचे भवितव्य घडविण्यासाठी याचा अभ्यास करुन त्याचा वापर योग्य रितीने करावा. त्यात अनेक सुविधा आहेत त्याचा लाभ घेऊन नौकरी व्यवसाय मिळवावेत. देवकुरळी येथेच महादेव मंदिराच्या सभागृहाचे भुमिपुजनही पालकमंत्री श्री.चव्हाण यांच्या हस्ते झाले.
 
Top