सोलापूर :- साखर उद्योगातील स्पर्धेत टिकण्यासाठी साखर कारखान्यांनी साखर निर्मितीबरोबरच उपपदार्थ निर्मिती, वीज निर्मितीकडे वळावे असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
             अक्कलकोट तालुक्यातील रद्देवाडी येथे मातोश्री लक्ष्मी शुगर को जनरेशन इंडस्ट्रिज लि. सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या उभारणी आणि प्रथम गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण हे होते. यावेळी माजी मंत्री आनंदराव देवकाते, कारखान्याचे संस्थापक चेअरमन  सातलिंगाप्पा म्हेत्रे, चेअरमन माजी मंत्री सिध्दराम म्हेत्रे,  आमदार प्रणितीताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, या साखर कारखान्याच्या रुपाने दुष्काळी तालुक्यात मोठा उद्योग उभा राहिला आहे. राज्यातील अनेक कारखाने यावर्षी आजारी पडले आहेत. मिश्र पध्दतीने साखर कारखानदारी यावर्षी चालू आहे. गेल्यावर्षी राज्यात ९० लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर कारखानादारासमोरील स्पर्धा लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नवीन पध्दतीचे बेणे,  उपपदार्थ निर्मिती आदी कल्पकतेने साखर कारखाने चालविले पाहिजेत असे प्रतिपादन केले.
    गेल्या वर्षी राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला राज्य शासन या दुष्काळी भागातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मजुरांना काम, जनावरांचा चारा, पिण्याचे  टँकरद्वारे पाणी आदी संकटाचा मुकाबला केला. सलग दुस-या वर्षीही राज्यातील काही तालुक्यांत दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळाचा दुस-या वर्षीही दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन कटीबध्द असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
    राज्यात १ लाख कोटी रुपयाच्या सिंचनाच्या योजना प्रलंबित आहेत. यामध्ये कशाला प्राथमिकता           द्यावयाची याबाबतचा विचार करुन प्राथमिकता ठरविताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले आहे. यासाठी २२०० कोटी रुपयाचा कार्यक्रम केंद्र शासनाला सादर केला असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. यामध्ये अंतिम टप्प्यातील प्रकल्प, अवर्षणप्रवण तालुक्यातील काही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. अक्कलकोट परिसरातील एकरुख व देगांव या सिंचनाच्या योजना मार्गी लावण्यासाठी निधी दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली.  राज्यातील यावर्षीची अडचणीची परिस्थिती लक्षात घेता शेतीमध्ये अमुलाग्र बदल केले पाहिजेत, पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. ऊस, कापूस पिकासाठी शेतक-यांची ठिबकची मोठी मागणी आहे ही वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
  अध्यक्षीय भाषणात दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले की, साखर कारखान्याकडे शासनाचे लक्ष आहे. या साखर कारखान्याच्या माध्यमातून या भागात समृध्दी निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करुन कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामास शुभेच्छा दिल्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सिंचन, सामाजिक न्याय, घरकुल योजनेबाबत माहिती दिली.
प्रारंभी कारखान्याचे संस्थापक चेअरमन सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर चेअरमन माजी मंत्री सिध्दराम म्हेत्रे यांनी प्रास्ताविकात शेतक-यांच्या हितासाठीच कारखाना काढला आहे. त्याला शेतक-यांनी प्रोत्साहन द्यावे. ऊस वेळेवर द्यावा, ऊसाचे उत्पादन वाढवावे असे आवाहन केले. तसेच या परिसरातील एकरुख व देगांव सिंचन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. पंढरपूर - तुळजापूरच्या धर्तीवर अक्कलकोट प्राधिकरण स्थापन करावे आदी मागण्या मांडल्या.
याप्रसंगी कारखान्याचे सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
 
Top