मुंबई -: महाराष्ट्रात उद्योग वाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असून स्पॅनीश कंपन्यांच्या राज्यातील औद्योगिक गुंतवणूकीत अडसर होऊ नये म्हणून विद्यापीठांमध्ये स्पॅनीश भाषेचे वर्ग सुरू करण्याबाबत शासन प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
स्पेनच्या शिष्टमंडळासमवेत उद्योगविस्तार व गुंतवणुकीसंदर्भात सह्याद्री अतिथी गृहात बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
हायस्पीड रेल्वेचा अभ्यास करणार  
         स्पॅनिश भाषेचे वर्ग सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनोदयाचे  कौतुक करून स्पेनच्या शिष्टमंडळाचे प्रमुख व स्पेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जोस मॅन्युअल गार्सिया मारगॅलो यावेळी म्हणाले की, स्पॅनीश गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे महत्वाचे डेस्टीनेशन आहे. दळणवळणाच्या सुविधा, वीज, टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातील औद्योगक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. हायस्पीड रेल्वे महाराष्ट्रात सुरू करण्याबाबत आम्ही जरूर अभ्यास करु असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चर्चेच्या प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, युरोपीयन देशांच्या लोकसंख्येएवढ्या आकाराचे महाराष्ट्र हे एक मोठे राज्य आहे. देशात होणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीतील 35 टक्के गुंतवणुक ही महाराष्ट्रात होते. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीमुळे जागतिक औद्योगिक नकाशात महाराष्ट्राचे स्थान महत्वाचे आहे. राज्यात नागरीकरण आणि औद्योगिकरण वेगात होत असून उद्योगवाढीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळाची येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे. 
पायाभूत क्षेत्रात स्पेनने गुंतवणूक करावी 
राज्य शासनाने वाहतूक, दळणवळण, गृहनिर्माण, वीज, बंदरे या पायाभूत क्षेत्रांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रातील उद्योगवाढीसाठी स्पॅनीश कंपन्यांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक करावी, असे आवाहन त्यांनी केले. वाहन, वस्त्रोद्योग, माहिती व तंत्रज्ञान, फार्मास्युटीकल या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक वाढीसोबतच सामाजिक विकासासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या विविध योजनांची माहितीही शिष्टमंडळाला दिली. 
  महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा, लेणी, किल्ले यामुळे महाराष्ट्र हे टुरीझम डेस्टीनेशन बनले आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी स्पेनने पर्यटन क्षेत्रात प्राप्त केलेल्या अव्वल स्थानाबद्दल कौतुकही केले. 
  अर्थमंत्री जयंत पाटील यांनी स्पेनमधील हायस्पीड रेल्वेत प्रवास केल्याची आठवण सांगितली. राज्यातील महत्वाची शहरे हायस्पीड रेल्वेने जोडण्यासाठी व ही सेवा आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने स्पेनने यासाठी तांत्रिकदृष्ट्या मदत करण्याचे आवाहन केले. 
यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी  यांनी  राज्यातील उद्योग विकासाबाबतचे सादरीकरण केले. मॅग्नेटीक महाराष्ट्र ही लघुचित्रफित यावेळी दाखविण्यात आली. स्पेनच्या शिष्टमंडळातर्फेही सादरीकरण करण्यात आले.
बैठकीस उद्योगमंत्री नारायण राणे, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, भारताचे स्पेनमधील राजदूत सुनिल लाल, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ए. के. जैन, एमएमआरडीएचे आयुक्त राहुल अस्थाना, वित्त विभागाचे प्रधान सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव, कृषी विभागाचे प्रधान सचिव सुधीरकुमार गोयल, मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव सुमित मलीक, एमएडीसीचे उपाध्यक्ष यु.पी.एस.मदान, महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक राधिका रस्तोगी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे उपस्थित होते.
            संरक्षण मंत्री पेड्रो मोरेनस, पायाभूत सुविधा मंत्री ॲना पेस्टर, राजदूत गुस्ताव डी ॲरीस्टेगुई, व्यापार राज्यमंत्री जेमी गार्सिया लेगाज आदींसह स्पेनमधील उद्योजकांचा समावेश होता.

 
Top