मुंबई : राज्यातील ग्रंथालयांचे संगणकीकरण करण्याचे काम महाराष्ट्र ज्ञान विकास महामंडळाला देण्यात आले असून ही सर्व ग्रंथालये संगणकाच्या साहाय्याने जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
              ग्रंथालय संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालये पुरस्कार आणि डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार 2011-12 चे वितरण मंगळवारी शासकीय मध्यवर्ती ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी समारंभाचे अध्यक्ष म्हणून श्री.टोपे बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.रमेश जनबंधू, राजा राम मोहन रॉय प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा.जे.बी.नाईक, ग्रंथालय संचालक दि.श्री.चव्हाण आणि ग्रंथालय चळवळीचे कार्यकर्ते व स्वयंसेवक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
            आजचे युग हे संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे आहे. ई-बुक्स आणि ई-लायब्ररीच्या युगात पारंपरिक ग्रंथालयांमध्ये काही बदल करावे लागणे अपरिहार्य आहे, असे सांगून श्री.टोपे म्हणाले, ग्रंथालये ही माहिती केंद्रे आणि ज्ञान केंद्रे व्हावीत यासाठी त्यांचा संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक विकास होणे आवश्यक आहे. या चळवळीच्या माध्यमातून समाजात वाचन संस्कृती रुजावी आणि ग्रामीण भागात तसेच वाड्या-वस्त्यांपर्यंत प्रेरणादायी यशकथा सांगणारी पुस्तके पोहोचावीत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
          श्री.टोपे म्हणाले, ग्रंथालय चळवळीच्या विकास आणि विस्ताराबाबत शासनाचे धोरण सकारात्मक आहे. दर पाच वर्षांनी ग्रंथालयांच्या अनुदानाची रक्कम दुप्पट करण्याच्या अनुषंगाने राज्यातील ग्रंथालयांची पटपडताळणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ग्रंथालय चळवळ निकोप आणि सुदृढ करण्यासाठी जी ग्रंथालये निकषानुसार चालवली जात नसतील त्यांच्या बाबत कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य ग्रंथालय परिषदेच्या निर्मितीचा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला असून जिल्हास्तरावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी हे पद निर्माण करुन त्यांना अधिक अधिकार दिले जातील, अशी घोषणाही श्री.टोपे यांनी यावेळी केली.
           मधुकर भावे यांनी सर्व पुरस्कार प्राप्त ग्रंथालयांचे तसेच ग्रंथालय सेवक व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. सध्या एका गावातील एकाच ग्रंथालयाला अनुदान दिले जाते. ग्रंथालय कायद्यातील ही त्रुटी दूर करुन गावात जेवढी चांगली ग्रंथालये असतील त्या सर्वांना अनुदान दिले जावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. वाचन संस्कृती तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ग्रंथालय चळवळ नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास जे.बी.नाईक यांनी व्यक्त केला. 
           प्रारंभी श्री.चव्हाण यांनी राज्यातील ग्रंथालय संचालनालयाच्या कार्याविषयी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय तसेच डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट कार्यकर्ता व कर्मचारी ग्रंथमित्र पुरस्कारांविषयी माहिती दिली. उत्कृष्ट ग्रंथालयाचा 'अ' वर्ग पुरस्कार पुणे मराठी ग्रंथालय नारायण पेठ, पुणे यांना देण्यात आला. तर ग्रामीण विभागात सार्वजनिक वाचनालय राजगुरु नगर, पुणे यांना देण्यात आला. पन्नास हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रा.डॉ.गजानन जगन्नाथ कोटेवार, रामनगर, वर्धा यांना तर उकृष्ट कर्मचाऱ्यांसाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार बबन नामदेव आखरे, खामगाव, जि.बुलढाणा यांना देण्यात आला. पंचवीस हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या समारंभात आठ उत्कृष्ट ग्रंथालये, सात उत्‍कृष्ट कार्यकर्ते आणि पाच उत्कृष्ट कर्मचारी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
 
Top