मुंबई : महानगरातील विविध सार्वजनिक रुग्णालयांमधून लहान मुले पळविण्याच्या घटनांची गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून पळवून नेलेल्या मुलांच्या शोधासाठी स्वतंत्र पथक नेमण्याचे आदेश त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले.
           सार्वजनिक रुग्णालयांमधून लहान मुले पळविण्याच्या घटनांसंदर्भात मंगळवारी मंत्रालयात गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी मुंबईचे महापौर सुनील प्रभू, आयुक्त सीताराम कुंटे, गृह विभागाचे सचिव विनित अग्रवाल, पोलीस आयुक्त डॉ.सत्यपाल सिंह, वाडिया रुग्णालयाच्या विश्वस्त श्रीमती चंद्रा अय्यंगार आदी उपस्थित होते.
           यावेळी श्री.पाटील यांनी 2009 पासून सार्वजनिक रुग्णालयांतून मुले पळविण्यात आलेल्या घटनांची पोलीस आयुक्तांकडून माहिती घेतली. 2009 पासून सायन रुग्णालय, व्ही.एन.देसाई रुग्णालय, शिवाजीनगर येथील रुग्णालय, कामा रुग्णालय आणि वाडिया रुग्णालयातून पळवून नेलेल्या लहान मुलांच्या शोधासाठी स्वतंत्र तपास आणि गुप्तचर पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालयांमध्ये प्रसूतीकक्षातील खाटांच्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात करण्याच्या सूचना देऊन प्रसंगी राज्य सुरक्षा महामंडळाचे सुरक्षा रक्षक महापालिकेला देण्याची तयारीही गृहमंत्र्यांनी यावेळी दाखवली. महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याबरोबरच रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 
             मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची महानगरपालिकेच्या वतीने अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे महापौर श्री.प्रभू यांनी यावेळी सांगितले. खासगी, सरकारी रुग्णालयांना न्यायालयाचे निर्देश परिपत्रकाद्वारे कळवावेत आणि आरोग्य विभागाकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही गृहमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती मनीषा म्हैसकर, सह पोलीस आयुक्त हिमांशू रॉय, सदानंद दाते, पोलीस महानिरीक्षक देवेन भारती, अपर पोलीस आयुक्त सुनील पारसकर आदी अधिकारी उपस्थित होते. 

उत्कृष्ट शोधासाठी गृहमंत्री-महापौरांकडून प्रत्येकी 50 हजारांचे बक्षीस जाहीर

          लहान मुले पळवून नेलेल्या प्रकरणांचा कौशल्याने शोध लावणाऱ्‍या पोलीस पथकाला गृहमंत्री आर.आर.पाटील आणि मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बक्षीस आज जाहीर करण्यात आले.
 
Top