मुंबई -: उत्‍कृष्‍ट आणि गुणवत्‍तापूर्ण सेवेबद्दल पोलीसांना देण्‍यात येणा-या पोलीस महासंचालकांच्‍या सन्‍मानचिन्‍हांच्‍या संख्‍येत वाढ करण्‍याचा निर्णय शासनाने घेतला असून आता यापुढे २५० च्‍या ऐवजी ५०० सन्‍मानचिन्‍ह पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना देण्‍यात येणार असल्‍याची माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली.
पोलीस दलात उत्‍कृष्‍ट आणि गुणवत्‍तापूर्वक सेवा करणा-या अधिकारी, कर्मचा-यांना दरवर्षी १ मे रोजी महाराष्‍ट्रदिनी पोलीस महासंचालकांचे सन्‍मानचिन्‍ह (पदक) देऊन सन्‍मानित करण्‍यात येते. १९९२ मध्‍ये ५० जणांना ही सन्‍मानचिन्‍हे प्रदान केली जात होती. मात्र, पोलीसांच्‍या वाढत्‍या संख्‍येच्‍या तुलनेत पदकांची संख्‍या कमी असल्‍याने २००७ पासून प्रतिवर्षी २५० जणांना सन्‍मानचिन्‍हांनी गौरविण्‍यात येते.
महाराष्‍ट्र पोलीस दलाचे संख्‍याबळ १ लाख ९८ हजार इतके असून २५० सन्‍मानचिन्‍हे कमी पडत असल्‍याने उत्‍कृष्‍ट आणि गुणवत्‍तापूर्ण कामगिरी बजावूनही अनेक अधिकारी, कर्मचा-यांना या पदकांपासून वंचित राहावे लागते, याची दखल घेऊन पोलीस महासंचालकांनी सन्‍मानचिन्‍हांच्‍या संख्‍येत २५० वरून ५०० इतकी वाढ करण्‍याचा प्रस्‍ताव गृह विभागाकडे दिला होता. हा प्रस्‍ताव गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी मान्‍य केला असून ५०० पदकांपैकी २० टक्‍के म्‍हणजेच १०० पदके ही चकमकीत जखमी झालेल्‍या आणि अतेरिकी, नक्षलवाद्यांविरूद्ध केलेल्‍या कारवाईत सामील झालेल्‍या पोलीस अधिकारी, कर्मचा-यांसाठी राखीव ठेवण्‍याचाही निर्णय गृहमंत्र्यांनी घेतला आहे. गृहमंत्र्यांच्‍या मान्‍यतेनंतर हा प्रस्‍ताव आता वित्‍त विभागाकडे पाठविण्‍यात आला आहे.
 
Top