मुंबई -: डिसेंबर २०१२ मध्ये मुदत संपणाऱ्या ३ हजार २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २६ नोव्हेंबर २०१२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
               या निवडणुकांसाठी ३० जून २०१२ ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल. नामनिर्देशनपत्रे ७ ते १० नोव्हेंबर २०१२ या कालावधीत दिली व स्वीकारली जातील. १२ नोव्हेंबर २०१२ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १६ नोव्हेंबर २०१२ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या  उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ या कालावधीत मतदान होईल. दुस-या दिवशी २७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. निकाल घोषित झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
              आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीकडे जात पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास नामनिर्देशनपत्रासोबत या समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाचा पुरावा जोडणे आवश्यक राहील. त्याचबरोबर निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे विहित नमुन्यातील हमीपत्रही उमेदवाराने देणे बंधनकारक आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
               सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (EVM) मतदान घेण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा दैनंदिन हिशेब सादर करणे आवश्यक राहील; तसेच निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल. ती मुदतीत सादर न करणाऱ्या उमेदवारांना अनर्ह ठरविण्यात येते, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही राज्य निवडणूक आयुक्तांनी केले आहे. 

जिल्हानिहाय मतदान होणा-या ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे :

ठाणे-९३, रायगड-१५, रत्नागिरी-२, सिंधुदुर्ग-३२९, नाशिक-१, धुळे-२५, अहमदनगर-७४, जळगाव-१३०, पुणे-२०९, सोलापूर-१३८, सातारा-३०, सांगली-६८, कोल्हापूर-४४, औरंगाबाद-२, बीड-७००, नांदेड-५६, परभणी-१२२, जालना-१२३, लातूर-२, हिंगोली-३३, अमरावती-१५५, अकोला-२७७, बुलडाणा-१, वाशिम-२८७, वर्धा-१०९, भंडारा-१, गडचिरोली-१.
एकूण- ३ हजार २७.
 
Top