मुंबई -: यावर्षी झालेला अवेळी पाऊस व काही जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची हजेरी यामुळे साखर उत्पादनात ४० टक्क्यांपेक्षा जास्त घट येण्याची शक्यता आहे, ही परिस्थिती लक्षात घेऊन साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने शासनाशी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले. 
            महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे तात्यासाहेब काळे, बी. आर. पाटील, आर. बी. शिंदे, अॅड. संतोष मस्के, शिवाजीराव काळे या प्रतिनिधींनी आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन साखर कामगारांची प्रलंबित देण्यांबाबत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी साखर कारखान्यांचे मालक जयप्रकाश दांडेगावकर, शिवाजीराव नागवडे उपस्थित होते.
         १ जुलै २०११ रोजी झालेल्या त्रिपक्षीय समिती करारानुसार साखर कामगारांची देणी चुकती करण्याबाबत महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, साखर आयुक्त व सहकारी साखर कारखान्यांचे मालक यांनी परस्परांच्या चर्चेतून व माहितीच्या आदान-प्रदानातून समन्वयाने मार्ग काढावा, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 
Top