उस्मानाबाद -: प्रत्येक पोलीस हा गणवेशातील नागरीक असून प्रत्येक नागरीक हा साध्या वेशातील पोलीस आहे, असे सांगून माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जास्तीत जास्त लोकांनी उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाच्या वेबसाईटचा उपयोग करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.
बुधवार दि. 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर जनतेसाठी उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाची वेबसाईट (www.osmanabadpolice.com) इंटरनेवर उपलब्ध केली आहे. या वेबसाईटचे उद्घाटन पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता अधिक्षक कार्यालयात करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक बी.यू. भांगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सौ. वैशाली कडूकर, पोलीस उपअधिक्षक दत्तात्रय कांबळे, पोलीस उपअधिक्षक अब्दुल सत्तार शेख, पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, एफ.एस. पाटील, जगन्नाथ भोसले यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दस-याच्या शुभमुहुर्तावर शुभारंभ करण्यात आलेल्या वेबसाईटमध्ये उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाचे मिशन स्टेटमेंट, व्हीजन, पोलीस दलाचा इतिहास, पोलीस रँक, जिल्ह्यातील महत्त्वाचे शासकीय कार्यालयाचे संपर्क फोन नंबर, जिल्हा पोलीस दलाची रचना, पोलीस मुख्यालयातील विविध शाखा व विशेष शाखा, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये व पोलीस स्टेशनबाबत माहिती, महात्मा गांधी तंटामुक्त योजना, एक गाव एक गणपती, जिल्ह्यातील रेकॉर्डवरील फरारी आरोपी, हरवलेल्या व्यक्ती, मोटार वाहन चोरी, माहितीचा अधिकार, पोलीस विभागातील वार्ता, पोलीस कल्याण विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबतची माहिती तसेच जनतेसाठी सुरक्षा विषयक घ्यावयाची काळजी बाबतची माहिती यासह महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाच्या वेबसाईटच्या लिंक, महिला व बालकांसाठी woman helpline, Choild helpline नंबर, पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क फोन नंबर, facebook व twitter अकाउँट आणि उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाची फोटो गॅलरी, जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, पोलीस ठाणे यांचे संपर्क नंबर, ई-मेल आयडी जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाच्या संबंधाने जनतेला काही सूचना, तक्रारी किंवा इतर माहिती द्यावयाची असल्यास 'Contact Us' मधुन देण्याची सुविधा या वेबसाईटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
जनतेनी पोलीसांना सहकार्य करून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत करावी व जनतेने जागृत नागरीक बनावे, उस्मानाबाद जिल्हा पोलीस दल सदैव आपल्या सेवेत तत्पर राहील असे सांगून सर्व नागरीकांना जिल्हा पोलीस दलातर्फे दस-याचे शुभेच्छा देण्यात आले आहे.
