पुणे :–  महाराष्ट्र विधानमंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष सोहळा आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त उद्योग विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ नोव्हेंबर 2012 रोजी येथील विधान भवन परिसरात हा परिसंवाद होईल. या परिसंवादाचे उदघाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते  होणार आहे, अशी माहिती विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी आज येथे दिली.
            या कार्यक्रमाच्या तयारीबाबत डॉ. कळसे यांनी आज विधान भवन येथे सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस प्रभारी विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी विकास देशमुख, उपायुक्त तुकाराम पवार यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
              डॉ. कळसे यांनी सांगितले की, उच्चाधिकार समितीने नऊ नोव्हेंबरला पुण्यातील विधानभवन येथे कार्यक्रम घ्यावा असा निर्णय घेतला. या कार्यक्रमास विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे पीठासीन अधिकारी, उपपीठासीन अधिकारी, विरोधी पक्षनेते, राज्यातील केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रीमंडळाचे मंत्री, राज्यमंत्री,  आजी-माजी संसद सदस्य, विधीमंडळाचे आजी-माजी सदस्य, पुणे महसुली विभागातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे अमुक्रमे महापौर, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्यासह           सर्व नगरसेवक, सदस्य, वरिष्ठ शासकीय अधिकारी यांना निमंत्रित केले जाणार आहे.
          या परिसंवादाच्या ठिकाणीच विधानमंडळाच्या अमृतमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेले प्रदर्शनही उभे केले जाणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन नऊ तारखेला सकाळी दहा वाजता होईल. परिसंवाद एक दिवसाचा असेल पण हे प्रदर्शन तीन दिवस असेल, असे डॉ. कळसे यांनी सांगितले. 
              हा कार्यक्रम अतिशय नेटका आणि नियोजनबद्ध केला जाईल, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना प्रभारी विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिल्या. आज झालेल्या बैठकीत हा कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच विधान भवन परिसरात मंडप उभ्या करावयाच्या जागेचीही पाहणी डॉ. कळसे यांनी केली. 

 
Top