उस्‍मानाबाद -: जिल्‍ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वाहन अपघाताच्‍या घटनेत एक ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्‍याची घटना घडली आहे. 
     श्रावण राम राठोड (वय ३५) असे अपघातात ठार झालेल्‍या मोटारसायकल स्‍वाराचे नाव आहे. तर भाऊसाहेब सदाशिव शिंदे (रा. वाकरवाडी), गोरोबा रामहारी ऐस्‍कळ (रा. गोवर्धनवाडी), इकबाल अहमद हरून रशिद रंगरेज (वय ३२ वर्ष, रा. भाग्‍यनगर, उस्‍मानाबाद) असे वेगवेगळ्या अपघातातील जखमींचे नावे आहेत.

उमरगा -    उमरगा ते लातूर जाणा-या रस्‍त्‍यावर टेम्‍पाने (क्रं. एमएच १४ एएस ६७०९) लातूरकडे जाणा-या मोटारसायकल क्रं. एमएच 25 जे 1383  यास समोरासमोर जोराची धडक देऊन मोटारसायकल स्‍वार श्रावण राठोड यास गंभीर जखमी करून त्‍याच्‍या मरणास कारणीभूत झाल्‍याने टेम्‍पोचालक मुबारक अब्‍दुल काझी (रा. तुरोरी, ता. उमरगा) याच्‍याविरूद्ध सहाय्यक पोलीस फौजदार एल.एन. होळकर यांच्‍या फिर्यादीवरून गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. हा अपघात दि. १७ ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्‍याच्‍या सुमारास झाला होता.

ढोकी - दि. २१ ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्‍याच्‍या सुमारास भाऊसाहेब सदाशिव शिंदे हे मोटारसायकल क्रं. एमएच १२ एचटी ८८७७ यावर स्‍वार होऊन तेरहून ढोकीकडे जात असताना यावेळी ढोकीकडून गोवर्धनवाडीकडे जाणारी मोटारसायकल क्रं. एमएच १२ बीजे ६७२ यावरील स्‍वार गोरोबा ऐस्‍कळ यांच्‍यात समोरासमोर जोरदार धडक झाली त्‍यात दोघेजणही गंभीर जखमी झाल्‍याने गणेश चंद्रकांत शिंदे यांच्‍या‍ फिर्यादीवरून ढोकी पोलिसात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून तपास हवालदार दंडे करीत आहेत.

उस्‍मानाबाद - भरधाव जाणा-या जीपने मोटारसायकला पाठीमागून धडक देऊन झालेल्‍या अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्‍याची घटना दि. १८ ऑक्‍टोबर रोजी रात्री दहा वाजता उस्‍मानाबाद पोलीस मुख्‍यालय मैदानाजवळ राष्‍ट्रीय महामार्ग क्रं २११ रस्‍त्‍यावरील महावितरण कार्यालयासमोर घडली. जीप क्रं. एमएच ४५ ए ७३३२ चा चालक प्रशांत रकमाजी मोरे (रा. जुनी गल्‍ली, विजय चौक, उस्‍मानाबाद) याने त्‍याच्‍या ताब्‍यातील जीप अतिवेगाने निष्‍काळजीपणे चालवुन मोटारसायकल स्वारास जोराची धडक देऊन इकबाल अहमद रंगरेज यास गंभीर जखमी केले व मोटारसायकलचे नुकसान झाले. प्रशांत मोरे याच्‍याविरूद्ध इकबाल रंगरेज याच्‍या जबाबावरून उस्‍मानाबाद शहर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलीस नाईक सोनार हे पुढील तपास करीत आहेत.
 
Top