सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यात पर्यावरण संतुलीत ग्राम योजनेंतर्गत केवळ दोन वर्षात १०२८ ग्रामपंचायतीपैकी तब्बल ४३४ ग्रामपचांयती पात्र झाल्या असून १२ कोटींचा निधी या योजनेंतर्गत मिळविण्यात जिल्हा यशस्वी ठरला आहे.
ग्रामविकास विभागाकडून सन २०१०-११ या वर्षात या योजनेस सुरुवात झाली. प्रत्येक गावात विकासाच्या नव-नव्या संकल्पना राबविणा-या आघाडी शासनाने पुरोगामी महाराष्ट्राची ग्रामीण मानसिकता पर्यावरण पूरक करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून खंबीर पाऊले उचलली. गाव करी ते राव काय करी या म्हणीला सार्थ ठरवित सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी या योजनेला भरघोस प्रतिसाद दिला अनगर हे त्याचे उत्तम उदाहरण.
अनगर हे मोहोळ माढा रस्त्यावर तालुका मुख्यालयापासून १२ कि.मी. वर वसलेले काना, मात्रा, वेलांटीचे कसलेही ओझे नसलेले सरळ गावं.सुमारे 8000 लोकसंख्या असलेल्या गावात सन १९५२ साली ग्रामपंचायतीची स्थापना झाली. स्थापनेपासून आजतागायत ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झालेली आहे. गावांत ग्रामपंचायतीचे सर्व नियम पाळले जात होते तरीही गावक-यांमध्ये पर्यावरणीय कार्यक्रमांविषयक जागृतीची कमतरता होती. पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम गावातील लोकांचा म्हणावा तितका सहभाग दिसून येत नव्हता. किंबहूना या योजनेचे पर्यावरणीय महत्व लोकांना समजलेले नव्हते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याबरोबर वीजेचाही तुटवडा जाणवत होता. वारंवार उद्भवणा-या या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा निर्धार गावाने केला. त्यासाठी शासनाच्या या योनजेमध्ये सहभाग घेण्याच्या आवश्यकतेची जाणीव होऊन गावाक-यांनी लोक वर्गणीतून ग्रामपंचायत हद्दीत लोकसंख्ये इतकी वृक्ष लागवड केली. संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमांतील प्रत्येक कुटुंबाने स्वयंस्फुर्तीने शौचालय बांधुन त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे जनावरांचे गोठे बायोगॅस संयंत्राला जोडले गेल्याने दैनंदिन उर्जेची गरज पूर्ण झाली. गावातील प्रत्येक व्यक्तीने झाडे दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. ग्रामस्थांनी सर्व प्रकारचा कर भरणा केल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली.
ग्रामपंचायतीने ग्रामसभा, फलक, लोकनाट्य, कलापथक, फलक याद्वारे योजनेची प्रसिध्दी करुन ग्रामस्थांमध्ये प्रबोधन केले. गावांतील शाळा, महाविद्यालयांनी वृक्षदिंडी काढून पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. अशा उपक्रमांमूळे लोकसहभाग, महिलांचा सहभाग वाढू लागला. लोकांना पर्यावरण संवर्धनाचे स्वच्छतेचे महत्व पटू लागले. सुरुवातीला झाडे लावणे या संकल्पनेकडे दुर्लक्ष करणा-या लोकांनी पुढे जाऊन या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक कुटुंबाकडे तसचे शेतक-यांना गावात लावण्यात आलेली झाडे दत्तक देऊन ती जतन करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. करवसुली तसेच लोकवर्गणीतून ग्रामपंचायतीने SOLAR PLANT व पाण्याची टाकी बवसूवन ग्रामस्थांची पाण्याची अडचण दूर केली. सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत ग्रामपंचायतीने कमी खर्चात बांधलेल्या भूमिगत गटारी जिल्ह्यात अनगर पॅटर्न म्हणून प्रसिध्द आहेत.
या सर्व प्रयत्नांना यश येऊन ग्रामपंचायत या योजनेत प्रथम वर्षासाठी पात्र झाली. पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम हा किताब गावाला मिळाला. रुपये ६१ हजार इतकी रक्कम ग्रामपंचायतीस अक्षिस म्हणून मिळाली. त्यातून ग्रामपंचायतीने २५ सौर पथदिवे खरेदी करुन गावांतील वाड्यावस्त्यांवर दिवाबत्तीची सोय केली.
आज गावांत घरोघरी शौचालयाचा वापर, सांडपाणी वाहक भूमिगत गटारी, शंभर टक्के कच-याचे संकलन असल्यामूळे सगळीकडे स्वच्छतेचे साम्राज्य आहे. ग्रामस्थांनी सर्व प्रकारचा कर भरणा केल्याने ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे. त्यामूळे ग्रामस्थांनी पाण्याची तक्रार ग्रामपंचायतीने दूर केली आहे. बायोगॅस, सौर उर्जेवर चालणारे पथदिवे, सौर अभ्यासिका सारख्या ECO-FRIENDLY ऊर्जा साधनांमूळे गावांतील दैनंदिन उर्जेची गरज पूर्ण होऊन गांव स्वयंपूर्ण झाले आहे. शेतक-यांनी लावलेल्या फळझाडांमूळे शेतीबरोबर पुरक व्यवसायनिर्मिती होऊन त्यांच्यात ग्रामपंचायत ख-या अर्थाने पर्यावरण संतुलित झाली आहे.
आज आपण केलेल्या प्रयत्नांना आलेल्या यशाचे तेज ग्रामस्थांच्या चेह-यांवर झळकताना दिसत आहे. पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेतून पवनचक्कीचा प्रकल्प उभारुन ग्रामपंचायतीने संपूर्ण गांव वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. आणि यापुढेही अशीच एकजुटीने प्रयत्न करुन शासनाच्या प्रत्येक योजनेत उत्स्फुर्त सहभाग होण्याची इच्छा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.