मुंबई -: मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेण्यासाठी ई-स्कॉलरशिप योजनेंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ई शिष्यवृत्तीसाठी http://mahaeschol.maharashtra.gov.in /escholarship/login.aspx या वेबसाईटवरती १५ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाहीत. विद्यार्थी, विविध संघटना व महाविद्यालयांकडून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी विनंती करण्यात आल्याने आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदतवाढ १५ नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्यावर राहणार आहे.
ऑनलाईन शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. शैक्षणिक शुल्क व इतर अनुषंगिक शुल्क महाविद्यालयाच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते. या योजनेंतर्गत जवळपास १८०० कोटी रुपये विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. वाढीव मुदतीत ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी नोव्हेंबर २०१२ नंतर संपूर्ण शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ई शिष्यवृत्ती योजनेस केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे पारितोषिक मिळाले आहे.
ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेचा आसन क्रमांक, उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, इत्यादी आवश्यक माहिती सोबत ठेवावी. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण किंवा संबंधित विभागाचे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण यांच्याशी संपर्क साधावा.