नळदुर्ग -: नळदुर्ग परिसरातून आंध्रप्रदेशची राजधानी हैदराबादकडे शासकीय वितरण प्रणालीचा काळ्या बाजारात जाणारा पावणे दोनशे क्विंटल गहू ट्रकसह उमरगा येथे पोलीसानी जप्त केले. या कारवाईत पावणे आठ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल पोलीसानी हस्तगत केले असून एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरूवार रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
श्रीकांत लिंबाजी लंगडे (वय 28 वर्षे, रा. फुलवाडी, ता. तुळजापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
फुलवाडी (ता. तुळजापूर) येथून शासकीय वितरणाचा गहू ट्रकमध्ये भरून हैदराबादच्या दिशेने जात असताना उमरगा येथे पोलीसानी संशयावरून ट्रकला आडवून तपासणी केली असता शासकीय कोटयातील गहू असल्याचे दिसून आले. हा गहू काळ्या बाजारात जादा दराने विक्री करण्यासाठी जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेत 1 लाख 70 हजार रूपये किमतीचा गहू, 50 किलो वजनाचे सुमारे 340 गव्हाचे पोते व ट्रकसह एकूण 7 लाख 70 हजार रूपयेचा मुद्देमाल पोलीसानी जप्त केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत कासले यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल नागरगोजे हे करीत आहेत.