नळदुर्ग -: खुदावाडी (ता. तुळजापूर) येथील ग्रामपंचायतच्‍या सरपंचपदी कॉंग्रेसचे रेवणसिध्‍द स्‍वामी तर उपसरपंचपदी शिवाप्‍पा जवळगे यांची बिनविरोध निवड करण्‍यात आली.
            खुदावाडी ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेस पुरस्‍कृत पॅनलने स्‍पष्‍ट बहुमत मिळवून विरोधी संत गाडगेबाबा ग्रामविकास पॅनलचा दारूण पराभव केला होता. गुरूवार रोजी सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणुक पार पडली. निवडणुक निर्णय अधिकारी म्‍हणून ग्रामसेवक संजय घोगरे यांनी कामकाज पाहिले. यावेळी पॅनलप्रमुख शरणाप्‍पा कबाडे, दिगंबद कबाडे, कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे संचालक हरिष जाधव यांच्‍यासह नूतन सदस्‍य उपस्थित होते.

* नंदगाव सरपंचपदी राष्‍ट्रवादीच्‍या शिवम्‍मा पाटील

नळदुर्ग -: नंदगाव (ता. तुळजापूर) येथील ग्रामपंचायतच्‍या सरपंचपदी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या शिवम्‍मा जगन्‍नाथ पाटील तर उपसरपंचपदी लक्ष्‍मी मोरे यांची निवड करण्‍यात आली. नंदगाव ग्रामपंचायतच्‍या निवडणुकीत राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पुरस्‍कृत पॅनलने वर्चस्‍व मिळविले. 
गुरूवार दि. 22 नोव्‍हेंबर रोजी सरपंच, उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी राष्‍ट्रवादीकडून सरपंच पदासाठी शिवम्‍मा पाटील, कॉंग्रेसकडून वैशाली वाघमारे तर उपसरपंचपदासाठी राष्‍ट्रवादीचे लक्ष्‍मी मोरे, कॉंग्रेसकडून राजू काटे यानी अर्ज दाखल केला होता. राष्‍ट्रवादीच्‍या उमेदवाराना प्रत्‍येकी सात तर कॉंग्रेसच्‍या उमेदवाराना प्रत्‍येक चार मते पडली. त्‍यामुळे राष्‍ट्रवादीच्‍या शिवम्‍मा पाटील व लक्ष्‍मी मोरे यांची अनुक्रमे सरपंच, उपसरपंचपदासाठी निवड झाल्‍याचे जाहीर करण्‍यात आले. यावेळी कार्यकर्त्‍यांनी जल्‍लोष साजरा केला. निवडणुक निर्णय अधिकारी म्‍हणून संपत जाधव तर ग्रामसेवक नडगिरे यांनी सहकार्य केले.

* दहिटणा सरपंचपदी राष्‍ट्रवादीच्‍या संगीता माने

नळदुर्ग -: दहिटणा (ता. तुळजापूर) ग्रामपंचायतीच्‍या सरपंचपदासाठी राष्‍ट्रवादीच्‍या संगीता माने तर उपसरंपचपदी शाळुबाई सुरवसे याना विजयी घोषित करण्‍यात आले.
दहिटणा ग्रामपंचायतीच्‍या सरपंच, उपसरपंचपदासाठी विशेष बैठक बोलविण्‍यात आली होती. सरपंचपदासाठी राष्‍ट्रवादीकडून संगीता माने, विरोधी पॅनलकडून उज्‍वला बिराजदार, उपसरपंचपदासाठी राष्‍ट्रवादीकडून शाळुबाई सुरवसे, विरोधी पॅनलकडून मनीषा बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. राष्‍ट्रवादी पुरस्‍कृत पॅनलच्‍या उमदेवाराना प्रत्‍येकी चार तर विरोधी पॅनलच्‍या उमेदवारांना प्रत्‍येकी तीन मते पडली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्‍या समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्‍यांनी फटाक्‍याची आति‍षबाजी करीत गुलालाची उधळण करून जल्‍लोष साजरा केला. निवडणुक निर्णय अधिकारी म्‍हणून एस.एस. सुलाखे यांनी तर ग्रामसेवक एस.व्‍ही. वानोळे यांनी सहाय्यक म्‍हणून काम पाहिले. यावेळी फयाज सावकार, संजय पाटील, बब्रुवान चव्‍हाण, भिमाशंकर पाटील, राजकुमार नागरसे, विश्‍वनाथ कुंभार आदीजण उपस्थित होते.

* सावरगाव सरपंचपदी कॉंग्रेसच्‍या प्रभावती मारडकर

नळदुर्ग -: सावरगाव (ता. तुळजापूर) येथील ग्रामपंचायतच्‍या गुरूवार रोजी झालेल्‍या सरपंच, उपसरपंच निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्‍या प्रभावती देविदास मारडकर तर उपसरपंचपदी अनंत रामदास बोबडे यांची बिनविरोध निवड करण्‍यात आली.
सावरगाव येथील निवडणुकीत कॉंग्रेसचे माजी जि.प. सदस्‍य संतोष बोबडे, कुलस्‍वामिनी सूतगिरणीचे संचालक रामेश्‍वर तोडकरी यांच्‍यासह इतर मान्‍यवराच्‍या नेतृत्‍वाखाली 13 पैकी 10 जागेवर कॉंग्रेसने घवघवीत यश मिळवून राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचा दारूण पराभव केला होता. त्‍यामुळे सावरगाव ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस पुरस्‍कृतच्‍या श्री नागनाथ महाराज ग्रामविकास पॅनलने वर्चस्‍व कायम ठेवले आहे. सरपंच, उपसरपंच पदाच्‍या निवडीनंतर नूतन सरपंच प्रभावती मारडकर, उपसरपंच अनंत बोबडे, नूतन ग्रामपंचायत सदस्‍य सीमा देवकर, रेश्‍मा माळी, चंद्रकांत घोडके, सीताबाई चव्‍हाण, सुषमा व्‍हटकर यांचा विशेष सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्‍हणून दशरथ देवकर, ग्रामविकास अधिकारी मनोज पाटील, तलाठी तात्‍यासाहेब रूपनूर यांनी काम पाहिले. यावेळी यशवंत कुलकर्णी, भागवत डोलारे, प्रताप माने, हणमंत फंड, नागनाथ तोडकरी, किसन काढगावकर यांच्‍यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top