गुलाब भिमा पवार

    जीवनात येणार्‍या संकटांना एक आव्हान समजून प्राप्त प्रतिकुल परिस्थितीमध्ये सामाजिक न्यायाच्या भूमिकेने व समर्पित भावनेतून सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय राहणारा एक त्यागी व्यक्तिमत्त्व गुलाब भिमा पवार यांचे सत्कार्य आजही समाजाला एक दिशादर्शक व प्रेरणादायी ठरणारे आहे.
          मराठवाड्यातील उस्मानाबाद या विकसनशील जिल्ह्याच्या सामाजिक प्रवर्तनात भर म्हणून दाळींब (ता. उमरगा) ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या शास्त्रीनगर या तांड्याला सामाजिक आणि शैक्षणिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं रचनात्मक कार्य करणारा एक ध्येयवादी कार्यकर्ता म्हणून गुलाब पवार यांची जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण होत आहे. स्वार्थ त्यागी वृत्तीने बंजारा व तत्सम विमुक्त भटक्या जमाती, दलित, वंचित समाजाला सामाजिक व आर्थिक प्रतिष्ठा मिळावी, हा एक ध्येयवाद उराशी बाळगून त्यांच्यात सार्थ स्वाभिमान व स्वावलंबन निर्माण करण्याच्या दृष्टीने गुलाब पवार यांनी आपल्या कार्याची मुर्हुतमेढ रोवली आहे. गाव कुसापासून दूर राहिलेल्या माणसाला गावपण व सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, यासाठी शासनाच्यावतीने कार्यान्वित केलेल्या विविध योजनांसह स्वखर्चाने व स्वपुढाकाराने गावपातळीवर पाणी, रस्ते, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेतकरी, व्यसनमुक्ती, सामाजिक विषमता निर्मूलन संबंधी मुलभूत सुविधा त्यानी उपलब्ध करुन दिल्या आहेत. तांडा वस्तीचा चेहरा व मोहरा बदलून टाकण्यामध्ये पवार यांनी जिद्द, चिकाटी, मेहनत व आत्मविश्वास आणि दृढ इच्छाशक्तीच्या बळावर केलेले व करीत असलेले कार्य खर्‍या अर्थाने सामाजिक न्यायाला अधिक विस्तृत करणारे आहे.
           मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी आपले बहुमोल योगदान दिलेल्या बंजारा समाजाच्या सर्वसामान्य कुटुंबातील भिमा अंबाजी पवार या स्वातंत्र्य सेनानीचे अल्पशिक्षित सुपुत्र गुलाब पवार यानी आपले जीवन इतरांसाठी वेचले आहे. दिवंगत भिमा पवार यानी अपार कष्ट व मेहनत करुन आपल्या कुटुंबियाचा चारितार्थ चालवित असे. गावात घर नाही, रानात शेत नाही, कुटुंबियाच्या उदरनिर्वाहासाठी कसलेही साधन नव्हते. अशाही परिस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी आपले योगदान दिले.
         दाळींब ग्रामपंचायत अंतर्गत शास्त्रीनगर या तांड्याचा समावेश असून येथील लोकसंख्या अकराशेच्या जवळपास आहे. तर १५५ कुटुंबियाचे या ठिकाणी वास्तव्य आहे. गुलाब पवार यांचे शिक्षण इयत्ता आठवीपर्यंत येणेगुर (ता. उमरगा) येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात सन १९७५ साली झाले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना पुुढील शिक्षण घेता आले नाही. ही खंत त्यांच्या मनाला लागून राहिल्याने शास्त्रीनगर येथील कोणीही मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, सर्वांना शिक्षण मिळावे, याकरीता त्यानी पाण्याखाली असलेली त्यांची थोडी बहुत शेतजमीनपैकी शेतातील ४० बाय ६० एवढी जागा शाळा सुरु करण्यासाठी सन १९९८ साली ग्रामपंचायतीला दानपत्र करुन दिले. या जागेत अंगणवाडी सुरु करण्यात आली असून सध्या ३५ विद्यार्थी शिकत आहेत. या ठिकाणी पाणीपुरवठ्याची कसलीही सोय नव्हती. पाण्यासाठी ग्रामस्थांना खूप दुरवरुन शेतातील विहीरीतून पाणी आणावे लागत होते. खोल विहीरीतून पाणी आणताना काहीजण पाय घसरुन विहीरीत पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व विदारक चित्र पाहून त्यांनी पुढाकार घेवून भूकंपग्रस्त भागात कार्यरत असलेल्या वर्ल्ड व्हिजन संस्थेस आपली व्यथा मांडून त्यांनी या ठिकाणी जवळच असलेल्या गोविंद पवार यांच्या शेतात विंधन विहीर खोदून घेतली. त्यास मुबलक पाणी लागले. बाया-बापड्याना कधीही पाणी मिळावे, याकरीता घरालगत असलेल्या मोकळ्या जागेत गुलाब पवार यांनी पन्नास हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी एका सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने स्वखर्चाने बांधली.
      महिलांचे सक्षमीकरण व्हावे व त्यांची आर्थिक प्रगती होवून जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९९९ साली शास्त्रीनगर मध्ये सहा महिला व एक पुरुष बचतगट असे मिळून सात बचगटाची स्थापना त्यांनी केली. प्रत्येकी गटात दहा महिला सदस्यांचा समावेश होता. बचतगटातील सदस्यांना लाखो रुपयेचे कर्ज वाटप करुन त्यातून महिलाना दुग्धव्यवसाय व इतर छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभारुन प्रगतीकडे वाटचाल सुरु केले आहे. महिलांनी प्रगती करुन आपला विकास करावा, यासाठी बचतगटाची माहिती देवून त्यांचा संसार सावरण्यास मोठी मदत केली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठ राहुरी, हिरवे बाजार, राळेगणसिद्धी, वर्धा, पारनेर, कोल्हापूर, लातूर यासह विविध ठिकाणी जावून शेती विषियक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर बचतगटाच्या महिलाना अभ्यास सहलासाठी नेवून गृह उद्योग, कुटीर उद्योग यासह छोट्यामोठ्या उद्योग व्यवसायाची माहिती घेतली. आपल्या भागातील अल्प भूधारक गरीब शेतकर्‍यांना मार्गदर्शन करुन सुधारित शेती करुन अधिक उत्पन्न कसे मिळविता येईल, याबाबत नेहमीच मार्गदर्शन करीत आहेत. त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय थोर व्यक्तींचे जयंती, पुण्यतिथी साजरी करुन त्यांच्या जीवनाविषयी माहिती सांगतात. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा वर्धापन दिन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिनी गुलाब पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन उत्साहाने साजरा करण्यात येतो.
 यावर्षी मोठया प्रमाणात तीव्र पाणाी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकाना पाणीसाठी एक किलोमीटर पर्यंत पायपीट करुन पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे पाहून त्यांनी मार्च २०१२ मध्ये स्वत:च्या शेतात स्वखर्चाने दोन विंधन विहीरी घेतली. त्यापैकी एका विंधन विहीरीस पाणी लागले. ते पाणी त्यांनी शेतीला न वापरता प्रथम प्राधान्य ग्रामस्थांना देऊन त्यांना शेतातून शास्त्रीनगर पर्यंत अडीच हजार फूट जलवाहिनी स्वखर्चाने करुन गेल्या सहा महिन्यापासून पाणीपुरवठा करीत आहेत.
          शिक्षण घेताना विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थितीमुळे अडवणूक होवू नये, यासाठी वर्ल्ड व्हिजन संस्थेच्या सहकार्याने त्यांनी डीएड, बीएड चे शिक्षण घेणार्‍या सहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयेप्रमाणे साठ हजार रुपये प्रवेश फी भरली. शास्त्रीनगर ते दाळींब गावापर्यंत तीन किमी अंतर चालत जावून मुला-मुलींना माध्यमिक शिक्षण घ्यावे लागते. या ठिकाणी वाहनांची वाहनाची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना फार मोठी कसरत करावी लागत असल्याने त्याना आतापर्यंत २२ सायकलचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर आजचा विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे पडू नये, म्हणून संगणक व टायपरायटिंग शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली आहे. शास्त्रीनगर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या शाळेवर शालेय शिक्षण समिती सदस्य म्हणून १९९३ पासून आजतागायत ते कार्यरत आहेत. या शाळेत सेवाभावी संस्थेच्या मदतीने त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश, खेळ्याचे साहित्य, इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क उपलब्ध करुन दिले.
सामाजिक कार्य पाहून नागरिकांनी सन २०१० मध्ये दाळींब ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना उभे करुन प्रचंड मतानी निवडुन आणले. तत्कालीन आमदार रविंद्र गायकवाड यांच्याकडून विशेष बाब म्हणून आमदार फंडातून सभागृह मंजूर करुन आणले. त्याचबरोबर हनुमान मंदीर पायापासून ते शिखरापर्यंत बांधकाम करण्याकामी विशेष पुढाकार घेवून त्यानी आपले योगदान दिले आहे. त्याचबरोबर सातत्याने विशेष प्रयत्न करुन तांड्यात सिमेंट रोड करुन घेतले.
       सामाजिक सलोखा राखावा म्हणून दारुबंदी, जुगार बंदी यासारखेे व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेवून तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्याचे एक मोठे काम त्यांनी हाती घेतले आहे. व्यसनामुळे कुटुंबाची होणारी वाताहात थांबवण्यासाठी त्यांचा फार मोठा सहभाग लाभलेला आहे. त्यांच्या या जीवन कार्याची प्रचिती सर्वांसमोर यावी व त्यांच्या कामाची पावती त्यांना मिळावी व त्यातून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेवून इतरांनीही सामाजिक बांधिलकी म्हणून कामाला सुरुवात करावी, असेच आहे.
           रस्ते, पाणी या मुलभूत सुविधांसह शेतकरी, बंजारा समाजातील दुर्लक्षित महिला, मुले-मुली, शिक्षण, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, राष्ट्रीय सण साजरा करणे, लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या अडीअडचणी दूर करणे, असे सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
 
Top