मुंबई -: 'मी आरती करायला जातोय' हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शेवटचे शब्द होते. सुमारे २७ वर्षे बाळासाहेबांची सेवा करणाऱया चंपासिंग थापा या सेवकाजवळ त्यांनी हे शब्द पुटपुटले होते, अशी माहिती तेथे उपस्थित सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
५५ वर्षाचे चंपासिंग थापा हे बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत बनले होते. कारण बाळासाहेबांच्या सवयी, आवडी-निवडी, छंद यापासून ते त्याचे जेवण, औषधे अशा प्रत्येक गोष्टीची थापा यांना माहिती झाली होती. मूळचे नेपाळचे असलेले थापा मुंबईत पोटा-पाण्यासाठी आले होते. शिवसेनेच्या एका तत्कालीन नगरसेवकामुळे ते बाळासाहेबांच्या संपर्कात आले. तेव्हापासून थापा हे ठाकरे कुटुंबियांचे एक महत्त्वाचे सदस्य बनले आहेत.
बाळासाहेब मागील काही दिवसांपासून सतत आजारी होते. याकाळात डॉक्टरांसोबत थापा हे कायम बाळासाहेबांच्या रुममध्ये असत. बाळासाहेबांची इतकी वर्षे सेवा केल्यानंतर थापा यांना त्यांची प्रत्येक हालचाल, नजर व कृती लक्षात येत असे. बाळासाहेबांच्या निधनाच्या तीन दिवस अगोदर (गुरुवारी) त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास पुरविण्यात आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी बाळासाहेबांना एक 'विशेष' इंजेक्शन दिल्यानंतर त्यांना थोडावेळ शुद्ध आली होती. त्यावेळी बाळासाहेब 'मी आरती करायला जातोय' हे शब्द थापाजवळ पुटपुटले होते, असे तेथे त्यावेळी उपस्थित असलेल्या सूत्रांनी स्पष्ट केले.
थापा यांना कोणत्याहीवेळी बाळासाहेबांच्या खोलीत जाण्याची परवानगी होती. थापा आपल्या 'साहेबांसाठी' 24 तास उपलब्ध असे. थापाची रुमही बाळासाहेबांच्या रुमशेजारीच होती.
थापांचा सेवाभाव, मेहनत करण्याची वृत्ती याच्यामुळे बाळासाहेब त्यांच्यावर मुलांसारखे प्रेम करत. 'तो माझ्याच कुटुंबातील आहे' असे बाळासाहेब त्यांना भेटायला येणा-यांना सांगायचे. ठाकरे कुटुंबियांचा अविभाज्य घटक बनलेल्या थापांची (बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरही) काळजी घेण्याची सूचना त्यांनी उद्धव यांना केली होती. माझ्या पश्चात थापा मातोश्रीतच कायम राहील, असेही बाळासाहेबांनी सांगून ठेवले होते.
* सौजन्य दिव्य मराठी
* सौजन्य दिव्य मराठी