मुंबई -: राष्ट्रीय शालेय 14 वर्षाखालील मुले-मुलींच्या फुटबॉल स्पर्धा 25 ते 29 नोव्हेंबर 2012 या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता क्रीडा मंत्री पद्माकर वळवी आणि मुंबई शहर जिल्हा पालक मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार असून समारोप 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता मुंबई स्कूल स्पोर्टस् असोसिएशन, आझाद मैदान, महानगरपालिका मार्ग येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. 
      शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत करण्यात येते. भारतीय शालेय खेळ महासंघ व संचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांनी सन 2012-13 या वर्षात राष्ट्रीय शालेय 14 वर्षाखालील मुले-मुलींच्या फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्याची जबाबदारी उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मुंबई विभाग, मुंबई या कार्यालयाकडे सोपवलेली आहे. त्यानुसार या स्पर्धा कर्नाटक स्पोर्टींग असोसिएशन, क्रॉस मैदान; गोवन स्पोर्टस् असोसिएशन, क्रॉस मैदान; मुंबई स्कूल स्पोर्टस असोसिएशन, आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
      या स्पर्धेत विविध राज्यांतील मुलांचे 22 आणि मुलींचे 12 संघांमधून एकूण 608 खेळाडू सहभागी होणार आहेत. या शालेय राष्ट्रीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी फुटबॉल प्रेमींनी उत्‍स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्षांनी केले आहे.
 
Top