उस्मानाबाद -: प्रत्येक गावांनी आपल्या येथे उपलब्ध असणा-या पाण्याचा जपून वापर करावा, अन्यथा आगामी काळात दुष्काळी परिस्थितीला सामारे जावे लागण्याची शक्यता आहे, असा इशारा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिला.
भूम तालुक्यातील पाथरुड येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ व विविध क्षेत्रातील गुणवंताचा सत्कार समारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोदावरी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार राहूल मोटे हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून जि.प.अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जि.प.सदस्य दत्तात्रय मोहिते व सुनिल भोईटे, भूम पंचायत समितीचे सभापती अण्णासाहेब भोगील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, अप्पासाहेब पाटील, विश्वास शिंदे, हनुमंत पाटोळे, सुनिल माळी यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, हे वर्ष पाण्यासाठी कठीण आहे. पाथरुड मध्ये या योजनेच्या माध्यमातून भरपूर पाणी लागल्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. गावात सर्वत्र घरगुती नळ जोडणी करुन ही योजना यशस्वी करावी. या गावाने पाणी अडवा व पाणी जिरवा या योजनेचा माध्यमातून चांगले काम करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार मोटे म्हणाले की, गाव हागणदारी मुक्त या नियमात उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांना नियमांना शिथीलता आणल्याबद्दलमुळे ही पाणी पुरवठा योजना पुर्णत्तवाकडे गेली आहे याबद्दल त्यांनी पालकमंत्री चव्हाण यांचे आभार मानले. या वर्षी पाऊस फारच कमी आहे. त्यामुळे जनावरांसाठी 2 छावण्याही उभारण्यात आल्याची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्हटृटे यांनी ही योजना या गावाने गावसमितीच्या सहमतीने चांगल्याप्रकारे राबविली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रारंभी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित गव्हाणे तर प्रास्ताविक व आभार बाळासाहेब आठवले यांनी केले.