मुंबई -: मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये बुधवारी दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.36 वाजता फाशी देण्यात आली. अजमल कसाबला लष्कर-ए-तोयबाने खास लष्करी प्रशिक्षण दिले होते. तब्बल 10 ते 15 मिनिटे श्वास रोखून धरण्याचे कसब कसाबने आत्मसात केले होते. त्यामुळे फाशी दिल्यानंतर कसाबचा प्राण जायला 6 ते 7 मिनिटे लागली.
येरवडा कारागृहातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कसाबला बुधवारी सकाळी साडे सात वाजता फाशी देण्यात आली. बाळू मोहिते या पोलिस कर्मचा-याने कसाबला फाशी दिली. ते येरवडा कारागृहातील अधिकृत जल्लाद नाहीत. मोहिते हे पुढील वर्षी मार्च महिन्यात पोलिस सेवेतून निवृत्त होणार आहेत. फाशी दिल्यानंतर 6 मिनिटांनी कसाबचा मृत्यू झाला. त्यानंतर 10 मिनिटांनी कसाबला सुळावरुन उतरविले आणि 7.45 वाजता त्याला मृत घोषित केले गेले.
सर्वसाधारणपणे फासावर चढविल्यानंतर सुमारे 2 मिनिटांमध्ये कोणत्याही व्यक्तीचा प्राण जातो. परंतु, कसाबला गतप्राण होण्यास 6 मिनिटे लागली. त्याला लष्करे तोयबाने कठोर असे लष्करी प्रशिक्षण दिले होते. सुमारे 10 ते 15 मिनिटे श्वास रोखून ठेवण्याची त्याची क्षमता होती. फाशी देण्यापूर्वीही कसाबने पुरेसा प्राणवायू फुफ्फुसांमध्ये साठवून ठेवला होता. त्यामुळेच त्याचा प्राण जाण्यास 6 मिनिटे लागली. अतिरेकी कारवायांसाठी दहशतवाद्यांना असे प्रशिक्षण देण्यात येते. धूर किंवा पाण्यातही 10 ते 15 मिनिटांसाठी श्वास रोखून ठेवण्याचे प्रशिक्षण कसाबला दिले होते.
सौजन्य दिव्य मराठी