मुंबई -: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेची मागणी नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. पुतळे उभारुन स्मारक करणे मनसेला मान्य नाही, असे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकार म्हटले आहे.
मनसेचे सरचिटणीस अनिल शिदारे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करुन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा द्यावी, अशी भूमिका घेतली होती. शिवाजी पार्कची जागा लहान आहे, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, यावरुन बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थकांनी मनसेवर कडाडून टीका केली. त्यानंतर आज मनसेने भूमिका स्पष्ट केली. 'केवळ पुतळे उभारुन स्मारक करणे मनसेला अमान्य आहे. त्याऐवजी लोकोपयोगी प्रकल्प राबावावे, प्रत्यक्ष जनतेच्या हितासाठी उपयोगी होईल, अशी वास्तू उभारावी किंवा उपक्रम राबवावा. त्यास बाळासाहेबांचे नाव द्यावे', असे मनसेने म्हटले आहे. नगरसेवक देशपांडे यांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकावरुन राजकारण सुरु होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्मारकासाठी इंदू मिलची जागा द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. तर मनसेच्या मागणीवर टीका करुन आनंदराज आंबेडकर यांनी स्मारकासाठी 'कोहिनूर'ची जागा वापरावी, अशी मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 6 डिसेंबरपर्यंत इंदू मिलची जागा देण्यात यावी. अन्यथा आम्हीच ताबा घेऊ, असा इशाराही आनंदराज आंबेडकर यांनी दिला. तर इंदू मिलच्या जागेची मागणी हास्यास्पद असल्याची टीका रिपाईंचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. तर शिवसेनेने शिवतीर्थावरच स्मारकासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. आज बाळसाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबई महापालिकेची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. त्यावेळी स्मारकाकबाबत विविध मागण्या करण्यात आल्या. भाजपचे नगरसेवक दिलीप पटेल यांनी नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्याची मागणी केली आहे. तर काही नगरसेवकांनी न्हावाशेवा सी-लिंक प्रकल्प आणि कोस्टल रोडलाही बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी केली. कॉंग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ यांनी दादर रेल्वे स्थानकालाच बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी केली. त्यामुळे नवाच वाद निर्माण झाला आहे. दादर स्थानकाला 'चैत्यभूमी टर्मिनस' असे नाव देण्याची मागणी पुढे करण्यात आली होती. परंतु, पण दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी नामकरणाला जाहीर विरोध केला होता. दादर स्टेशनचं नाव शिवसेना कधीही बदलू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.