* मारहाणप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा
ढोकी -: वाटणीच्या कारणावरून दगडाने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना पळसप (ता. उस्मानाबाद) येथे दि. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालाजी दशरथ लाकाळ (वय 42 वर्षे, रा. पळसप) असे गंभीर जखमीचे तर भारत दशरथ लाकाळ, गजेंद्र भारत लाकाळ, कल्याण भारत लाकाळ (सर्व रा. पळसप) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहे. यातील वरील तिघांनी जागा वाटण्याच्या कारणावरून भांडणाची कुरापत काढून बालाजी लाकाळ यांना शिवीगाळ करून डोक्यात दगडाने मारल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. बालाजी लाकाळ यांनी ढोकी पोलीसात फिर्याद दिल्यावरून तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ कराळे हे करीत आहेत.
* मारहाण प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
परंडा -: शिवप्रतिष्ठान शाखा का स्थापन केली या कारणावरून लाथाबुक्क्यांनी व दगडाने केलेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना दुधी (ता. परंडा) येथे दि. 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश बब्रुवान जाधव (रा. दुधी, ता. परंडा) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तर रघुनाथ रामहरी कवठे, नितीन माधव जाधव (दोघे रा. दुधी, ता. परंडा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. यातील उमेश जाधव यांना शिवप्रतिष्ठानेची स्थापन का केली म्हणून वरील दोघांनी संगनमताने त्यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारून गंभीर जखमी केले. उमेश जाधव यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीसात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बळे करीत आहेत.
* नौकरीचे अमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा
लोहारा -: दोघांनी संगनमत करून लोहारा येथील चौघांना नौकरीचे खोटे अमिष दाखवून 42 हजार 500 रूपये घेऊन नौकरी न देता खोटे नियुक्ती पत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी लोहारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक विठ्ठल बावगे, निलेश सुरूडकर ऊर्फ आर.एन. राजपुत (दोघे रा. नागपूर) यांनी संगनमत करून तौफिक गफुर कमाल (वय 30 वर्षे, रा. लोहारा बु) व त्याचे सहकारी यासिन शेख, जाकिर सिद्धीकी, वसिम सिद्धीकी, रफिक हेडडे (सर्व रा. लोहारा) यांना नौकरीचे अमिष देऊन वरीलप्रमाणे रक्कम घेऊन नौकरी न देता खोटे नियुक्ती पत्र देऊन फसवणूक केल्याची तक्रार तौफिक कमाल यानी पोलीसात दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पठाण करीत आहेत.
* अॅपेरिक्षाच्या धडकेत तिघे जखमी
तुळजापूर -: भरधाव वेगाने जाणा-या अॅपेरिक्षाने धडक दिल्याने अपघातात तिघे वाटसरू गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तुळजापूर ते नळदुर्ग रस्त्यावरील नवोदय विद्यालय समोर घडली.
सतिश शांताप्पा नंदेरगी (वय 15 वर्षे, रा. कवलगा, ता. आळंद), बाजीराव शहाजी यमगर (वय 50 वर्षे), गोकुळ नागनाथ यमगर (रा. यमरगवाडी, ता. तुळजापूर) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अॅपेरिक्षाने (क्रमांक एमएच 23/वाय 2129) निष्काळजीपणाने व भरधाव वेगात चालवून रस्त्यावरून चालत जाणा-या वरील तिघांना जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चालकाविरूद्ध गुंडेराव हनुमंतराव पाटील (रा. कवलगा, ता. आळंद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शिंदे करीत आहेत.
