नळदुर्ग -:  विषारी भोजन करून मृत्‍यूमुखी पडलेल्‍या घटनेत पती-पत्‍नी या दोघांविरूद्ध खुनाचा गुन्‍हा रविवार रोजी नळदुर्ग पोलीसात दाखल करण्‍यात आले असून आज सोमवार दि. 12 नोव्‍हेंबर रोजी एका आरोपी महिलेस अटक केली आहे. 
       शामराव रखबाजी बनसोडे (वय 85 वर्षे), दिगंबर विश्‍वंभर पाटील (वय 65 वर्षे) दोघे रा. बसवंतवाडी, ता. तुळजापूर असे विषारी भोजनामुळे मरण पावलेल्‍यांचे नाव आहे. तर प्रमोदकुमार बोबडे व प्रभावती प्रमोदकुमार बोबडे या दांम्‍पत्‍याविरूद्ध खुनाचा दाखल करून प्रभावती बोबडे या महिलेस पोलीसानी अटक केली आहे.
       बसवंतवाडी (ता. तुळजापूर) येथे‍ वरील बोबडे दांम्‍पत्‍यानी मांसाहार जेवणामध्‍ये विष घालुन ते प्रमोदचे मित्र बनसोडे व पाटील याना खाण्‍यास दिल्‍याने त्‍यात दोघाचा मृत्‍यू झाल्‍याचे तपासाअंती निष्‍पन्‍न झाले. ही घटना गेल्‍या आठवड्यात बसवंतवडी येथे घडली होती. सुरूवातीस या घटनेचे पोलीसात अकस्‍मात मृत्‍यू म्‍हणून नोंद करण्‍यात आली होती. मात्र तपासाअंती जेवणातून विष देणार्‍या दांम्पत्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल रविवार रोजी करण्यात आला आहे. 
बसवंतवाडी येथे प्रमोद कुमार बोबडे व त्याची पत्नी प्रभावती बोबडे यांनी त्यांच्या घरात ४ नोव्हेंबर रोजी मटनाचे जेवण केले होते. त्यांनी हे जेवण प्रमोदकुमार याचे मित्र शामराव रखमाजी बनसोडे (८५) आणि दिगंबर विश्‍वंभर पाटील (६५) यांना दिले होते. या दोघांनी सदरील जेवण केल्यानंतर रात्री त्यांना जुलाबाचा त्रास सुरू झाला. यात शामराव बनसोडे यांचा झोपेत मृत्यू झाल्याचे ५ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आले. तर दिगंबर पाटील यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचाही ५ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
मयताचे नातेवाईक भैरू दिगंबर शिंदे (पाटील) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरील पती-पत्नीविरूध्द गुन्हा दाखल झाला असून तपास दुय्यम फौजदार प्रकाश गायकवाड हे करीत आहेत.  

 
Top