नळदुर्ग -: यावर्षी सर्वत्र म्हणावे तसे पर्जन्यमान न झाल्याने दिवसेंदिवस भीषण जलसंकटाची चाहुल लागत आहे. शासनाने धरण पाणी साठ्याच्या पाचशे मीटर पर्यंत विंधन विहीर घेण्यास मनाई आदेश दिलेला असतानाही नळदुर्ग येथील कुरनूर (बोरी धरण) मध्यम प्रकल्पात शासनाच्या जागेत शासनाचे नियम धाब्यावर बसवून मोठ्याप्रमाणावर शेतकर्‍यांनी विंधन विहीरीची खोदाई करीत आहे. याबाबत प्रशासनाचे अधिकारी जाणुनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.
    नळदुर्ग येथील बोरी धरणातून तीर्थक्षेत्र तुळजापूर, अणदूर, नळदुर्ग व तुळजाभवानी कारखान्याला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र यावर्षी बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणावा तितका पाऊस न झाल्याने धरणात नवीन पाणी आले नाही. आजअखेर या धरणात पाण्याचा मृतसाठा असून काही दिवस पुरेल एवढेच पाणी आहे. त्यामुळे सध्या तुळजापूर व नळदुर्ग शहराला आठवड्यातून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर दिवाळी सणानंतर आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर धरण परिसरातील शेतकर्‍यांना पाणी उपशावर बंदी घालून मोटारीचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे.
     पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भूजलातील पाणी उपशावर नियंत्रणहोण्यासाठीसार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणार्‍या धरण साठ्याच्या, विहिरी किंवा कूपनलिकांच्या ५०० मीटर परिसरात खासगी विंधन विहिरी घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र या नियमाचे संबंधितानी लक्तरे वेशीला टांगून खुलेआम चिकुंद्रा, मुर्टा, होर्टी आदी गावच्या शिवारात असलेल्या बोरी धरणाच्या पात्रात शेतकर्‍यानी गेल्या तीन आठवड्यापासून धुमधडाक़्यात विंधन विहीर (बोअर) घेण्याचा सपाटा लावला आहे. याबाबत संबंधित अधिकारी चिरीमिरी घेवून प्रकरणदडपण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा शेतकर्‍यात होत आहे.तरी जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ शेतीसाठी बोअर घोतलेल्या वरील शेतकर्‍यांच्या तात्काळ विंधन विहीरीचे अधिग्रहण करुनते पाणीपुरवठा पिण्यासाठी नळदुर्ग, तुळजापूर जलवाहिनीकडे वळविण्याची मागणी होत आहे व दोषीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
 
Top