मुंबई -: शेतक-यांच्या हितासाठी  पीक कर्जाच्या व्याज सवलती प्रमाणे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणूक केलेल्या शेतमालाला सवलतीचे तारण कर्ज योजना लागू केली आहे. तरी या गोदामांमध्ये शेतमाल ठेवून त्यावर सवलतीच्या कर्ज योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. या शिवाय या हंगामात शेतक-यांनी त्यांचा कापूस व्यापा-यामार्फत न जाता जिनिंग करुन महामंडळाकडे साठवणूकीस द्यावा. त्यावर देखील सवलतीचे तारण कर्ज तात्काळ दिले जाणार आहे. 
         नाफेड आणि मार्केटिंग फेडरेशनकडून हमी भावाने ज्या ठिकाणी धान खरेदी योजना सुरु आहे, त्याकरिताही वखार महामंडळाची गोदामे प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.  
              ही योजना थोडक्यात कशी आहे तर सुगी हंगामाच्या वेळी बाजारपेठेत शेतमालाची आवक जास्त होत असल्यामुळे शेतक-यांना कमी दरात शेतमालाची विक्री करावी लागते अशा वेळेस कृषी मालाच्या साठवणुकीस प्राधान्य देऊन वखार महामंडळाने राज्यातील सर्वच ठिकाणच्या गोदामांमध्ये या हंगामात व्यवस्था केली आहे. वखार महामंडळाने शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी साठवण दराच्या ५० टक्के सवलत देऊन जागा आरक्षित करण्यात आली असून शेतकऱ्यांनी या सुगीच्या काळात व्यापाऱ्यांना शेतमाल न विकता तो वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर व्हावी म्हणून साठवण केलेल्या शेतमालावर पीक कर्जाप्रमाणे मालाच्या किंमतीच्या ७० टक्के सवलतीचे तारण कर्ज देण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण तातडीने दूर होवून धान्याला बाजारभाव मिळेपर्यंत गोदामात ठेवता येणार आहे. या मालासाठी महामंडळाने राज्यात २४०० कोटीच्या विम्याचे संरक्षण घेतले आहे. शेतमाल ठेवल्याबरोबर महामंडळाने दिलेली 'वखारपावती' बँकेकडे तारण ठेवावी. यासाठी महामंडळाने युनियन बँकेसह राज्यातील केंद्रांच्या जवळच्या इतर बँकांशी सामंजस्य करार केलेला आहे. त्यामुळे हंगामात अर्थसहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत साठवणूक सुविधेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल. 
               महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे जागतिक बँकेच्या राष्ट्रीय कृषी विकास प्रकल्प योजनेंतर्गत तसेच राष्ट्रीय कृषी योजना उपक्रमातून हा उपक्रम राबवित आहे. प्रथम टप्प्यात ४० वखार केंद्रावर व त्यानंतर १२८ वखार केंद्रावर ही सुविधा उपलब्ध होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी या तारण योजनेंतर्गत महामंडळाच्या वखार पावती योजनेचा लाभ घेऊन पीक कर्जाच्या सवलतीप्रमाणे या योजनेचा लाभ घ्यावा. 
            सर्व वखार केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वखार पावती व ऑनलाईन ट्रेडिंग सुविधा विकसित करणेकरिता, महामंडळाकडून वखारकेद्रांवर प्रयोगशाळा उपकरणे, संगणकप्रणाली, वेइग स्केल, क्लिनिग- ग्रेडिगं- स्टिचिंग- पॅकिंग युनिट, वखार पावती तारणऋण योजना इ. मुलभूत सुविधा दिल्या आहेत. प्रथम टप्प्यात अचलपूर, चांदूरबाजार, कोपरगाव, अहृमदनगर, वाशिम इत्यादी ठिकाणी या महिन्यापासून खरीप हंगामासाठी हे प्रकल्प सुरु केला आहे.
 
Top