तुळजापूर -: ख-या लाभार्थ्यांना मोफत वाटपासाठी आलेल्या पाणबुडी पंपाचे वाटप न करता बनावट कागदपत्रे बनवून पाणबुडी पंपाचे बोगस लाभार्थ्यांना वाटप करून गैरप्रकार करणा-या व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तुळजापूर पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकाविरूद्ध तुळजापूर पोलीसात गुन्हा दाखल करून गजाआड करण्यात आले.
अतुल हरिश्चंद्र वेदपाठ, कनिष्ठ सहाय्यक अभियंता पंचायत समिती तुळजापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. समाज कल्याण विभागातील पांडूरंग मारुती कांबळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, समाज कल्याण विभाग व जि.प.उस्मानाबाद यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील ६५ लाभार्थ्यांना मोफत वाटण्यासाठी १८ फेब्रुवारी २0१२ रोजी पंचायत समितीमध्ये पाणबुडी पंप आले होते. सदरील दिवसांपासून ते १६ ऑक्टोबर दरम्यानच्या काळात हे पंप खर्या लाभार्थ्यांना वाटप न करता २0 जणांची बनावट कागदपत्रे बनवून ते वाटण्यात आले. यामध्ये शासनाचे ३ लाख ५0 हजार ४00 रुपयांचे नुकसान झाले. तसेच शासनाची फसवणूक झाल्याची फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अतुल वेदपाठक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दुय्यम फौजदार गणपतराव जाधव हे करीत आहेत.