नळदुर्ग -: जळकोट (ता. तुळजापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकमेव वैद्यकीय अधिका-यांची वरिष्ठ अधिका-याने तोंडी आदेशाने अचानक बदली केली आहे. त्यामुळे येथील आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ही बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. बदली रद्द न झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.
जळकोट (ता. तुळजापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक गावातील रूग्ण उपचारासाठी येतात. या आरोग्य केंद्रात दोन निवासी वैद्यकीय अधिका-यांची पदे मंजूर आहेत. मात्र याठिकाणी एकच वैद्यकीय अधिका-यावर या आरोग्य केंद्राचा कारभार सुरू होता. येथील एका रिक्त पदाची भरती करण्याऐवजी जिल्हा आरोग्य अधिका-यांनी येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. निलंगेकर यांची बदली केली. ते जून 2011 पासून जळकोट आरोग्य केंद्रात कार्यरत होते. ते येथे चांगली सेवा बजावत असताना त्यांची अणदूर (ता. तुळजापूर) येथे बदली करण्यात आल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. डॉ. निलंगेकर यांच्या जागी जळकोट येथील सुर्यवंशी यांना कार्यरत राहण्याचे तोंडी आदेश जिल्हा आरोग्य अधिका-यांनी दिल्याचे समजते.