पंढरपूर -: तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आता विठ्ठलाचे ऑनलाईन बुकींग दर्शन सुरु करण्यात आले असून राज्यातील सात जिल्ह्यात त्याचा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आण्णा डांगे यांनी दिली.
           कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभुमीवर श्री. विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संत तुकाराम भवन येथे घेण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. 
            ऑनलाईन दर्शनाचा प्रयोग पहिल्यांदा पुणे विभागातील पुणे- सातारा - सांगली- सोलापूर व कोल्हापूर यासह कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी या जिल्ह्यात केला जाणार आहे. यासंबंधित जिल्ह्यात असणा-या 82 सेतू कार्यालयामध्ये भाविकांना ऑनलाईन दर्शन पास मिळणार आहे. या ऑनलाईन दर्शन पासावर भाविकांना दर्शनाची तारीख व वेळ दिली जाईल त्यामुळे साहाजिकच भाविकांचा वेळ वाचेल असे श्री. डांगे म्हणाले. तसेच भीमा नदीच्या पैलतीरी असणा-या नगरपरिषदेच्या 65 एकर जागेवर संत पीठासह भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवास व अन्य सोयी सुविधा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. 
राज्यात विठ्ठलाच्या असणा-या ज्या शेत जमिनी आहेत त्या परत घेण्यासाठी  अथवा तडजोड करण्याचा निर्णय घेण्यासाठी निवृत्त तहसीलदाराची नियुक्ती मंदीर समिती करणार असल्याचेही श्री. डांगे यांनी यावेळी सांगितले. 
        या बैठकीसाठी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, प्रांताधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्यासह मंदीर समितीचे सदस्य बाळासाहेब बडवे, वसंत पाटील, जयंत भंडारे, वा.ना. उत्पात आदी उपस्थित होते.

 
Top