स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही भटक्यांच्या जीवनात स्वातंत्र्याचा सूर्य पोहोचलाच नाही. लोक देतील ते अन्न, भिकेतून मिळेल ते वस्त्र आणि चार बांबूचे पाल ही यांची ‘मालमत्ता’. स्वातंत्र्यानंतर त्यांच्यापर्यंत ज्ञानगंगा पोहोचली नाही. आरोग्यसुविधा यांना काय असते ते माहित नाही, अशा या भटक्यांना ‘सामाजिक समरसता मंचाने’ भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातुन संघटित केले.
           सांगायला गांव नाही, राहायला घर नाही, वर्षानुवर्ष समाजाला लागलेला गुन्‍हेगारी कलंक घेवून जन्माला आले. पोलिसांचा पिच्छा कायम मागे, मग संसार कसा उभा करायचा. ही भटक्या विमुक्तांची समस्या, शासनास याकडे लक्ष द्यायला वेळ कुठाय! परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अशा भटक्याना संघटित करून नवे जीवन जगण्याची आशा दाखविली. पश्‍चिम महाराष्ट्राच्या सिमेलगत असलेल्या व मराठवाड्यात असणार्‍या यमगरवाडी (ता.तुळजापूर) येथे भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातुन आदर्श आकार घेत आहे.
            ‘एकलव्य आश्रमशाळा’. ‘चलो जलाएँ दीप वहॉं, जहॉं अभी भी अंधेरा है’! म्हणत संघाचे संघटन कार्य सुरू असून भटक्यांसाठी यमगरवाडी प्रकल्प हे एक आधार केंद्र बनले आहे. भिल्ल, पारधी, वैदू, वडार, बहुरूपी, वासुदेव, नाथजोगी, नंदीबैलवाले, मरीआईवाले, मेंडंगी-जोशी, सरोदे, शिकलकार, कोल्हाटी, धनगर, यासह २८ जातीच्या भटक्या समाजातील बांधवांची स्वातंत्र्यातही भटकंती सुरूच आहे. संपूर्ण भारतात ब्रिटिशांना भटके विमुक्त जेरीस आणू लागले. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी १८८१ साली ब्रिटिशांनी जन्मजात गुन्हेगारीचा कायदा केला व तुरूंगात डांबले. या जाचक कायद्यापासुन वाचण्यासाठी भटक्यांची भटकंती सुरू झाली. रानावनातुन लपून राहायचे, पोलीस कायद्यापासुन स्वत:चा बचाव करायचा. पण पोटाची खळगी भरणार कशी? याकरिता या बांधवांनी चोरीसारख्या घृणित गोष्टीचा आसरा घेतल्याचे सर्वश्रूत आहे. पण त्यांचे दुर्भाग्य! चोरीचा कायमचा आणि जन्मजात शिक्का त्यांच्यावर बसला. आज स्वातंत्र्यातही सन्मानाचे जीवन जगण्याचे भाग्य या बांधवांचे उजाडले नाही. शासकीय पातळीवर जनगणेत, मतदार यादीत यांना स्थान नाही. तर ८० टक्केपेक्षा अधिक निरक्षर लोक आहेत. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही भटक्यांच्या जीवनात स्वातंत्र्याचा सूर्य पोहोचलाच नाही. लोक देतील ते अन्न, भिकेतून मिळेल ते वस्त्र आणि चार बाबूंचे पाल ही यांची ‘मालमत्ता’, ‘जी गावाची हगणदारी तीच यांची वतनदारी’.
      अशा या भटक्यांना ‘सामाजिक समरसता मंचाने’ भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून संघटीत केले. २ ऑक्टोबर १९९१ रोजी कै. मोहनराव गवंडी व कै. दामुअण्णा दाते, मुकूंदराव पणशीकर, भि.रा. तथा दादा इदाते, रमेश पतंगे, नाना नवले, गिरीश प्रभुणे यांच्या उपस्थितीत भटके विमुक्त परिषदेची स्थापना झाली. शिक्षण, स्वावलंबन, सन्मान व सुरक्षा या चार तत्वांचा अंगीकार करण्यात आला.
            १९९३ साली टिटवाळ्याचे माजी सैनिक रमेश चाटुफळे यांनी यमगरवाडी (ता.तुळजापूर) येथे १८ एकर जमिन दान दिली आणि यमगरवाडीच्या माळावर पारधी समाजातील या एका जातीच्‍या २५ मुलांना घेवून पहिली शाळा सुरू झाली. २५ मुले तीन झोपड्या अशा अवस्थेत तुकाराम माने, नागू गडेकर या स्वयंसेवकांनी यमगरवाडीच्या माळरानावर भटकेश्‍वराची आराधना करीत प्रकल्पाचे काम सुरू केले. आज १६ वर्षांत यमगरवाडी हे भटके विमुक्तांचे मुख्य केंद्र बनले आहे. सुरूवातीस शिक्षणापेक्षा आपली मुले सुरक्षित ठेवण्यासाठी पारधी समाज यमगरवाडीकडे येऊ लागला. आता त्यांना शिक्षणाचेही महत्त्व समजू लागले आहे. यमगरवाडीच्या एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेस १९९६ मध्ये शासनाची मान्यता मिळाली. 
             पहिली ते दहावी पर्यंतची या ठिकाणी शाळा असून एका जातीच्‍या २५ मुलाना सुरू झालेली शाळा आज ३२ जातीतील ४०० विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. त्यापैकी २७० मुले तर १३० मुली यांचा समावेश आहे. सन २००६-०७ मध्ये दहावीचा निकाल ८० टक्के लागला तर २००७-०८ पासुन आजपर्यंत शंभर टक्के निकाल लागत आला आहे. येथे शिक्षण घेतलेल्या पैकी आज तेरा मुले शिक्षक झाले. एक विद्यार्थी कॉम्प्युटर ऍन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर झाला, चार विद्यार्थी पॉलिटेक्नीकल आणि पाच विद्यार्थी नरसिंग कोर्स शिकत आहेत, चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. तर बुद्धीबळ स्पर्धेसाठी कु. रेखा राठोड या विद्यार्थींनीची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली होती. ११ विद्यार्थी क्रीडा क्षेत्रावर राज्य पातळीवर मैदान गाजवून आले, एकाच वर्षी क्रीडा स्पर्धेसाठी सोळा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निवड झाली होती, उस्मानाबाद जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये या विद्यार्थ्याचा गेल्या दोन-तीन वर्षापासुन सतत प्रथम क्रमांक येत आहे. यावर्षी तिघां विद्यार्थ्‍यांची राज्‍यस्‍तरीय मल्‍लखांब स्‍पर्धेसाठी निवड झाली आहे.
            याठिकाणच्या विद्यार्थ्यांना झांज व लेझीमचे प्रशिक्षण देण्यासाठी पुणे, मुंबई यासह अनेक शहरामध्ये खास निमंत्रित केले जाते. येथे सुसज्ज शाळेची इमारत, प्रयोगशाळा, आरोग्य विभाग, क्रीडांगण, आदी बांधले आहे. चांगल्या शाळेत पाल्यांना शिकवायचे म्हटले की, संस्थाचालक मोठी रक्कम डोनेशन म्हणुन मागतात. पण येथे विद्यार्थी स्वत:पुरते अन्न कमवतात. महात्मा फुले व्यवसाय मार्गदर्शन केंद्रात शिवणकाम, खडू, मेणबत्ती बनविणे, प्लबिंग, वेल्डींग व इलेक्ट्रीक कामे शिकविण्यात येतात. कला क्षेत्रातही इथली मुले अग्रेसर असून संगीत, गायन, अभिनय, त्यांच्या अंगचेच गुण आहेत. शेळगाव पारधी हत्याकांड, बालविवाह, अंधश्रद्धा, जातीयता, देशभक्त उमाजी, तंट्या भिल्ल, यासह इतर विषयांवर येथील विद्यार्थी भारदारपणे पथनाट्यही सादर करतात. माधव गोपालन व शेती विकास केंद्रातुन १८ एकर जमिन लागवडीखाली आणली. प्रकल्पास लागणारे अन्नधान्य येथेच पिकवले जाते. गोपालनातुन दुध मिळते, या कृषी विद्यापीठाची जोड देवून ग्रामविकास केंद्र उभारण्याचा संकल्प संस्थेचा आहे. या प्रकल्पास आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असून त्यापैकी लोकमान्य टिळक स्मारक समितीच्यावतीने डॉ. हेडगेवार स्मृती पुरस्कार सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या हस्ते २ जानेवारी २०११ रोजी देण्यात आले. कै. डॉ. नितु मांडके पुरस्कार, पुणे जनता सहकारी बँकेचा पुरस्कार, मालखरे प्रतिष्ठान औरंगाबाद, नातू फाउंडेशन पुणे व शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कारासह ढिगभर पुरस्कार आजपर्यंत एकलव्य आश्रमशाळेस मिळाले आहेत. या ठिकाणी दि. १४ एप्रिल २०११ रोजी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहनजी भागवत यांनी यमगरवाडीस भेट देऊन नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा त्‍यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाला. या प्रकल्‍पाचे व्‍यवस्‍थापक म्‍हणून उमाकांत मिटकर हे काम पाहत असून ते सतत शैक्षणिक गुणवत्‍ता व समाज कार्यासाठी ते अहोरात्र प्रयत्‍न करीत आहेत.
            या शाळेने खर्‍या अर्थाने प्रतिकुल परिस्थितीवर मात करून भटक्या समाजातील चिमुकल्यांचे भविष्य घडविण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होवून त्यांच्या जीवनात अखंड ज्ञानदिप लावून समाज प्रबोधनाचे कौतुकास्पद कार्य करीत आहे. या शाळेचा आदर्श इतर शाळेंनी घेतल्यास खर्‍या अर्थाने भविष्यात शिक्षणाच्या ज्ञानगंगेपासुन कोणीही वंचित राहणार नाही.
 
Top