नळदुर्ग -: येडोळा (ता. तुळजापूर) येथे शनिवार रोजी गायरानात चरण्यासाठी गेलेल्या शेळ्या विष मिश्रित खाद्य खाल्याने शेळ्या मृत्यूमुखी पडले होते. याप्रकरणी चौघांविरूद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या शेळ्यांचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिका-यांनी केले असून शेळीच्या पोटातील सात नमुने पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
धोंडीबा राठोड, किरण राठोड, रवी राठोड, टिंकू पवार (सर्व रा. येडोळा, ता. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी काशिनाथ मनोहर चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, अज्ञात व्यक्तीने सुडबुध्दीने पेंड व युरियामध्ये विषारी द्रव्य मिसळून शेळ्या व म्हशींना मारण्याचे निंदणीय कृत्य केले होते. सदरील घटना समजताच आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी 3 नोव्हेंबर रोजी जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्यासह येडोळा गावाला भेट दिली. यावेळी राजेंद्र जाधव व ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सदरील कृत्य करणा-या व्यक्तींवर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यास पोलीस अधिका-यांना सांगितले. या निंदणीय घटनेमुळे ज्यांच्या शेळ्या व म्हैस मरण पावले आहेत. त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. 3 नोव्हेंबर रोजी दोन वाजण्याच्या सुमारास येडोळा येथील गायरानात 14 शेळ्या आणि 1 म्हैस यांना विषारी औषध घालून मारल्याच्या आरोपाखाली वरील लोकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार रोजी उस्मानाबादचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एम. बोरकर, डॉ. एम.एस. जगताप, डॉ. एस.एस. ताकभाते आदीच्या पथकाने येडोळा येथे मरण पावलेल्या शेळ्या व म्हशीचे शवविच्छेदन केले. यावेळी डॉक्टरांनी शेळीच्या पोटातील सात नमुने पुढील तपासासाठी काढून घेतले आहेत. दरम्यान या घटनेमुळे येडोळा ग्रामस्थ चांगलेच हादरून गेले असून येडोळा मार्गे मोटारसायकलवरून हातभट्टी दारूचे ट्युब घेऊन जाणा-या व्यक्तीला येडोळा ग्रामस्थानी पकडून पोलीसांच्या हवाली केले आहे. पोलीसानी विषारी औषध घालून शेळ्या व म्हशीला मारणा-या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी येडोळा ग्रामस्थांनी केली आहे.