महान गायक मुकेश यांचा कसाब चाहता होता. त्याचे वकील अमीन सोलकर यांनी सांगितले की, तुरुंगात कसाब नेहमीच मुकेशची गाणी गुणगुणत असे. 'हम छोड़ चले हैं महफिल को, याद आए कभी तो मत रोना' हे त्याचे शब्द माझ्या कानात अजूनही घुमत आहेत. आर्थर रोड तुरुंगात त्याला मी भेटत असे तेव्हा तो हेच गाणे गुणगुणत असे. तो एकटेपणाला कंटाळला होता. त्यामुळे वाचायला वर्तमानपत्र मागत असे.
* कसाब आमच्यासाठी 'हीरो' : लष्कर
लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने कसाब आपला 'हीरो' असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याच्या फाशीने आणखी हल्ल्यांना प्रेरणा मिळेल, असेही म्हटले आहे. मात्र, पाकिस्तानी तालिबानने याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. रॉयटर्सशी फोनवरून बोलताना लष्करचा कमांडर म्हणाला की, तो आमचा हीरो होता आणि आम्हाला प्रेरणा देत राहील. इतर लढवय्येही त्याच वाटेवरून चालतील. तालिबानचा प्रवक्ता अहसानउल्ला अहसान म्हणाला की, ही फारच धक्कादायक बातमी आहे. त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे भारतीय भूमीवर एका मुसलमानाला फाशी देण्यात आली ही आहे.
* कसाब कसा पोहचला भारतात
अजमल कसाब मुंबईत कुबेर बोटीने घुसला होता. ही कुबेर बोट पोरबंदर शहरात राहणार्या मसानी कुटुंबीयांची होती. अजमल कसाब व त्यांच्या चार साथीदारांनी या बोटीचे अपहरण करून त्यावरील मच्छीमारांना ठार केले होते. कसाब व त्याच्या साथीदारांनी या बोटीचे अपहरण करून, नावाडी अमरशी टंडेल यांची हत्या केली होती. इतर चौघांमध्ये मुकेश अंबू, बलवंत प्रभुव आणि नानुबाबू (सर्व राहणार बलसाड) तसेच कोडीनार येथील रमेश नानजी यांची हत्या करून त्यांचे मृतदेह समुद्रात फेकून दिले होते.
* कसाब कोण होता?
पूर्ण नाव- मोहंमद अजमल आमिर कसाब
जन्म- 13 सप्टेंबर 1987,
गाव- फरीदकोट, जि. ओकारा, पंजाब (पाकिस्तान)
कसाबच्या नावातच मारकाट आहे. कस्साब शब्द अरबीतील क़स्ब धातूपासून बनला आहे. त्यात कापणे, आघात करणे, गळा कापणे (जिबह), पोकळ करणे, (आतडी वगैरे) वेगळी करणे, असे अर्थ आहेत. या अर्थांचा विचार केला तर 'क़स्ब'मध्ये पोकळ, रिक्त किंवा रिकाम्या जागेचा भाव दिसून येतो. जनावरांना हलाल केल्यानंतर त्यांच्या शरीरातील अवयव काढून त्या पोकळीत भुसा भरला जात असे व मृत प्राण्यांचे खरेखुरे मॉडेल तयार केले जात असत. जुन्या काळात प्राण्यांच्या कातडीपासून तंबू, शामियाने बनवले जात. कसाब शब्दाच्या मुळातच मारणे-कापणे आहे. कापणे, आघात करणे यासारख्या अर्थांचा विस्तार 'जिबह' करण्यात झाला. त्यापासूनच उर्दूतील कसाई हा शब्दही बनला आहे.
सौजन्य दिव्यमराठी
सौजन्य दिव्यमराठी