नळदुर्ग -: तुळजापूर तालुक्‍यातील श्रावणबाळ, इंदिरा गांधी, संजय गांधी योजनेतील मयत लाभार्थ्‍यांच्‍या नावावर ते मयत होण्‍यापूर्वी बँकेत जमा झालेले अनुदान त्‍यांच्‍या वारसाना देण्‍याचे आदेश तालुक्‍यातील बँकाना देण्‍याची मागणी पंचायत समिती सदस्‍य साहेबराव घुगे यानी तहसिलदार यांच्‍याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
श्रावणबाळ सेवाराज्‍य निवृत्‍ती वेतन, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ, इ‍ंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय अपंग निवृत्‍तीवेतन योजनेतून शासन पात्र लाभार्थ्‍यांची निवड करून त्‍यांना अनुदान मंजूर करते. मात्र कोणत्‍या ना कोणत्‍या कारणाने लाभार्थी मयत झाल्‍यास मयतापूर्वी त्‍यांच्‍या नावाची जमा झालेली बँकेतील रक्‍कम वारसाना दिली जात नाही. त्‍यामुळे खाते उघडणे रक्‍कम व अनुदान बँकेकडे पडून राहते, याविषयी मयत लाभार्थ्‍यांचे वारस बँकेत विचारपूस करण्‍यास गेले असता, अनुदान वारसाना देता येत नाही. वारस सिध्‍द करून या, अथवा तहसिलदार यांचे आदेश आणा, अशा बाबी सांगितल्‍या जातात. यामध्‍ये एखादा वारस ही बाब पूर्ण करतो, बहुतांश वारस यापासून वंचित राहत असल्‍याचे आढळून येताना दिसत आहे. लाभार्थी मयत होण्‍यापूर्वी एखादी दुसरे अनुदान त्‍यांच्‍या नावे जमा असते. ज्‍या उद्देशाने हे अनुदान सुरू केलेले असते त्‍याच उद्देशाने मयताच्‍या वारसाना सरळ सोप्‍या पध्‍दतीने देण्‍यात यावे, जेणेकरून त्‍या वारसाना शासनाकडून एकप्रकारे आधारच होईल. यासर्व बाबी समोर ठेवून तुळजापूर तहसिलदारानी तालुक्‍यातील सर्व बँकाना मयत लाभार्थ्‍याच्‍या नावे जमा असलेले अनुदान वारसाना देण्‍याची मागणी पंचायत समिती सदस्‍य साहेबराव घुगे यानी केली आहे.
 
Top