मुंबई -:  महाराष्ट्र पर्यटनासाठी उत्तम राज्य असून पोर्तुगालचे नागरिक येथील पर्यटन स्थळांचा लाभ निश्चित घेतील तसेच महाराष्ट्रातील टूर ऑपरेटर सोबत पोर्तुगाल देशात पर्यटकाची वाढ होण्यासंदर्भात  झालेली बैठक यशस्वी झाली असून त्याचा फायदा दोन्ही देशात पर्यटक वाढीस होईल, असा विश्वास पोर्तुगालच्या स्टेट पर्यटन सचिव सिसिलिया मेरिल्स यांनी व्यक्त केला. पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालयात दि. 21 नोव्‍हेंबर रोजी सदिच्छा भेट घेतली  त्यावेळी त्या बोलत होत्या.  
  यावेळी श्री.भुजबळ यांनी श्रीमती मेरिल्स व त्यांच्या समवेत आलेल्या शिष्टमंडळाचे पुच्छगुच्छ तसेच Mumbai view from Heaven Wild Maharashtra हे पुस्तक देऊन स्वागत केले. 
  पोर्तुगालच्या पर्यटन विकासासाठी त्यांची ही महाराष्ट्र भेट असल्याचे त्यांनी सांगितले. टूर ऑपरेटर्सच्या बैठकीत नवीन पर्यटन स्थळांची माहिती मिळाली असून पर्यटन आयोजकांचा उत्साह व प्रतिसाद पहाता हा दौरा यशस्वी झाल्याचेही श्रीमती सिसिलिया यांनी सांगितले. 
  महाराष्ट्रात पर्यटकांसाठी विविध सोयीं-सुविधा उपलब्ध असून परदेशी पर्यटकांचे राज्यात सदैव स्वागत आहे. त्यामुळे पोर्तुगाल पर्यटकांना महाराष्ट्रात येण्यासाठी विशेष सहकार्य करावे, असे श्री.भुजबळ यांनी त्यांना सांगितले. यावेळी बॉलीवूड, विविध पर्यटनस्थळे, तेथील सोयीं-सुविधा तसेच डेक्कन ओडीसी याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली.  शिष्टमंडळात जॉर्ज ऑलिवरा,जोस अमराल व रिना ॲबेसेकिमाया आदी मान्यवरांचा समावेश होता.

 
Top