मुंबई -: औरंगाबाद विभागाच्या पाणी पुरवठ्याबाबत सर्व स्तरावर विचार करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. जायकवाडी धरणात विविध धरणातून पाणी सोडून त्याचा वापर औरंगाबाद विभागात करण्याबाबतच्या नियोजनाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
या बैठकीला मंत्री महोदय सर्वश्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील, सुनील तटकरे, रामराजे निंबाळकर, बबनराव पाचपुते, जयदत्त क्षिरसागर, लक्ष्मणराव ढोबळे, राजेंद्र दर्डा, मधुकरराव चव्हाण, वर्षा गायकवाड राज्यमंत्री सर्वश्री प्रकाश सोंळके, डी.पी. सावंत, राजेंद्र मुळक, तसेच मराठवाडा, नाशिक, नगर विभागातील आमदार, जलसंपदा विभागाचे सचिव व्ही. गिरीराज, एकनाथ पाटील तसेच ऊर्जा, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जायकवाडी धरणाची सविस्तर माहिती घेऊन धरणात उपलब्ध असलेला एकूण जलसाठा तसेच त्या साठ्याचे 31 जुलै 2013 पर्यंत करावयाचे नियोजन याचा आराखडा सादर करण्यात आला. तसेच या जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागाच्या (नाशिक व अहमदनगर) धरणातील पाणी उपलब्धता आणि जायकवाडीसाठी सोडावयाचे पाणी याबाबत माहिती घेण्यात आली.
तद्नंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात संबंधितांशी सविस्तर चर्चा करुन पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.